Republic day 2022 | प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 51 पोलिसांचा होणार गौरव, 7 जणांना शौर्य पुरस्कार, चौघांना राष्ट्रपती पदक !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ।  देशभरात उद्या, बुधवारी ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी पोलिसांना त्यांच्या शौर्याबद्दल गौरविण्यात येते.यंदाही प्रजासत्ताक दिनी एकूण 939 पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 51 पोलिसांना समावेश आहे. (51 policemen from Maharashtra will be honored on Republic Day 2022, 7 will be awarded gallantry, four will be awarded President’s Medal)

महाराष्ट्रातील अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय महादेवराव करगावकर, कमांडंट प्रल्हाद निवृत्ती खाडे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत रामभाऊ गुंडगे आणि पोलीस उपनिरीक्षक अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात येणार आहे.

देशातील 189 पोलिसांना पोलीस शौर्य पदके देण्यात येणार आहेत. 189 शौर्य पुरस्कारांपैकी, सर्वाधिक 134 पुरस्कार जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील शौर्य कामगिरीबद्दल तिथल्या पोलिसांना पुरस्कृत करण्यात आले. अतिरेकी नक्षलवादग्रस्त भागातील 47 पोलीस आणि ईशान्य प्रदेशात 01 पोलिसांस त्यांच्या शौर्याबद्दल पुरस्कृत केले जाणार आहे.

शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्‍यांमध्ये 115 जवान जम्मू-काश्मीर पोलीस, 30 सीआरपीएफ, 03 आयटीबीपी, 02 बीएसएफ, 03 एसएसबी, 10 छत्तीसगड पोलीस,09 ओडिसा पोलीस आणि 07 महाराष्ट्र पोलीस आणि उर्वरित राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

तसेच 42 जवानांना अग्निशमन सेवा पदके घोषित करण्यात आली आहेत. यापैकी एका जवानास राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक आणि दोन जवानांना त्यांच्या संबंधित शौर्याबद्दल, शौर्यासाठीचे अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.

पोलिस शौर्य पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील खालील पोलिसांचा समावेश आहे

  1. गोपाल मणिराम उसेंडी, एपीएस आयपीएमजी
  2. महेंद्र गानू कुलेती, एनपीसी पीएमजी
  3. संजय गणपती बकमवार, पीसी पीएमजी
  4. भरत चिंतामण नागरे, पीएसआय पीएमजी
  5. दिवाकर केसरी नरोटे, एनपीसी पीएमजी
  6. निलेश्वर देवाजी पाडा, एनपीसी पीएमजी
  7. संतोष विजय पोटावी, पीसी पीएमजी

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी

  1. विनय महादेवराव करगावकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक, मुंबई,
  2. प्रल्हाद निवृत्ती खाडे, कमांडंट, एस. आर. पी. एफ. जीआर. व्हीआय, धुळे,
  3. चंद्रकांत रामभाऊ गुंडगे, पोलीस निरीक्षक, पी.टी.सी. दौंड, पुणे
  4. अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा, पोलीस उपनिरीक्षक. नांदेड