जामखेडमध्ये सुमारे आठ कोटी खर्चून होणार पोलिस बांधवासाठी सदनिका : गुरूवारी गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन (8 crore flat for police in Jamkhed: Bhumi Pujan at the hands of Home Minister on Thursday)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड येथील पोलिस कर्मचारी बांधव व अधिकारी निवासस्थानाचा प्रश्न रखडला होता अखेर हा प्रश्न मार्गी लागला आहे. सुमारे सात ते आठ कोटी रूपये खर्चून 38 सदनिका बांधण्याच्या कामाचा भूमीपूजन शुभारंभ उद्या गुरूवारी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते व आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.(8 crore flat for police in Jamkhed: Bhumi Pujan at the hands of Home Minister & MlA on Thursday)

जामखेड पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस बांधवांना निवासी राहण्यासाठी असलेली पोलिस वसाहत जीर्ण झाली होती. हा प्रश्न गेली अनेक वर्ष गाजत होता. जनतेचे रक्षण करणारे पोलिस बांधव व त्यांचे कुटूंबिय जीव मुठीत धरून या पोलिस वसाहतीत राहत होते. धोकादायक इमारतीमुळे अनेकांना खाजगी रूममध्ये भाड्याने रहावे लागत होते. शौचालये, गटारी यांचीही दुरावस्था झाली होती. परंतु आता जामखेड पोलिस दलातील पोलिस बांधवासह अधिकारी यांच्या निवास्थानाच्या वसाहतीचा प्रश्न मार्गी लागला आहे.गुरूवारी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पोलिस वसाहतीच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे.

कर्जत – जामखेड मतदारसंघातील पोलिस बांधवांच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लागावा याकरिता आमदार रोहित पवार यांनी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा केला होता. कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यात एकुण 15 कोटी रूपये खर्चून पोलिस बांधवांसह अधिकार्यांच्या नव्या निवासस्थानांच्या इमारतीचे काम केले जाणार आहे.

सुमारे सात ते आठ कोटी रूपये खर्चून 38 सदनिका जामखेड पोलिस स्टेशनच्या आवारात उभारल्या जाणार आहेत. या कामाचे गुरूवारी दुपारी साडेबारा वाजता भूमीपूजन होणार. या कार्यक्रमासाठी खासदार सुजय विखे पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक संजीवकुमार अग्रवाल , पोलिस उपाधिक्षक आण्णासाहेब जाधव उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिली आहे.