खर्ड्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात सापडला तोफगोळ्यांचा मोठा साठा (A large stock of artillery shells was found in the historic Bhuikot fort in Kharda)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथील भूईकिल्ल्यात पुरातत्व विभागाकडून सुरू असलेल्या उत्खननामध्ये तोफगोळ्यांचा मोठा साठा सापडला आहे. (A large stock of artillery shells was found in the historic Bhuikot fort in Kharda)

सध्या भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्ती, मजबुतीकरण व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. किल्ल्यामध्ये उत्खनन करत असताना  जवळपास ३११ तोफ गोळे तसेच तोफेचा काही भाग  सापडला आहे.१७९५ साली मराठा आणि निजाम यांच्यात झालेल्या लढाईमध्ये तोफगोळ्यांचा उपयोग झाला होता याचाच पुरावा आता उत्खननामध्ये समोर आला आहे. या ऐतिहासिक ठेव्यांचे पुरातत्व विभागाने खर्डा येथेच जतन करावे अशी मागणी खर्डा परिसरातील इतिहास प्रेमींमधून होऊ लागली आहे.

शुक्रवारी जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी खर्डा किल्ल्यातील उत्खनन झालेल्या भागाची पाहणी केली. त्याचबरोबर उत्खननामध्ये सापडलेल्या तोफगोळ्यांसह संपुर्ण किल्ला परिसराची पाहणी केली. यावेळी इतिहास तज्ञ प्रा धनंजय जवळेकर, पोलिस काँस्टेबल मनोज साखरे, पोलिस नाईक संभाजी शेंडे, सत्तार शेख, दत्तराज पवार सह आदी उपस्थित होते.सध्या खर्डा भूईकोट किल्ल्याच्या तटबंदीचे तसेच खंदकाचे नव्याने बांधकाम सुरू आहे. उत्खननात इथे तत्कालीन दगडी तोफांचे अवशेष, धान्याची कोठारे, दारूगोळ्याची कोठारे,तसेच काही चोरवाटा व भुयारी वाटाही नव्याने सापडल्या आहेत.

खर्डा येथील भूईकोट किल्ल्याच्या आतील भागातील उत्खननामध्ये सापडलेल्या तोफगोळ्यांच्या साठ्याची शुक्रवारी पाहणी केली. नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असा हा ऐतिहासिक ठेवा आहे. नागरिकांनी या तोफगोळ्यांचा अभ्यास करावा. कुठलीही छेडछाड करू नये. कुणीही तोफगोळ्यांना छेडछाड करताना आढळून आला तर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिला आहे.

ऐतिहासिक खर्डा शहरात आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून निंबाळकर गढीवर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रालयात खर्डा किल्ल्याच्या उत्खननामध्ये सापडलेल्या ऐतिहासिक तोफ गोळ्यांसह इतर पुरातन वस्तुंचे संवर्धन होणे आवश्यक आहे असे मत माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर यांनी व्यक्त केले आहे. (A large stock of artillery shells was found in the historic Bhuikot fort in Kharda)