अभिषेक घोसाळकर हत्याकांड प्रकरण : कुटुंबासह कुलू मनालीला फिरायला जायचं ठरलं होतं पण नियतीने वेगळाच डाव साधला !
Abhishek Ghosalkar Morris noronha : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. माॅरिस नरोन्हा या स्थानिक गुंडाने हे हत्याकांड घडवून आणले. अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Murder Case) यांच्यावर गोळीबार केल्यानंतर माॅरिसने (Morris noronha Dahisar) स्वता:वर गोळीबार करत आत्महत्या केली. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर शुक्रवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या धाकट्या भावाने त्यांना अग्नी दिला. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या प्रविण नावाच्या कार्यकर्त्याने धक्कादायक खुलासा केला आहे.
प्रविण म्हणाला की, फेसबुक लाईव्ह सुरू असताना माॅरिस उठला. त्याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर बंदुक ताणल्याचे मी पाहिले. केबिनमध्ये गेल्यावर मॉरिस मागच्या बाजूने पळून गेल्याचेही बघितले असल्याचे सांगितले. ज्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख फेसबुक लाईव्हमध्ये केला आहे. त्या मेहुल पारीख याला आपण विचारणा केल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमानिमित्त बोलावले. मात्र, तिथली परिस्थिती बघून संशय आला होता. अनेक वेळा अभिषेक भाईंना आम्ही दुसऱ्या कार्यक्रमाला जायचे सांगून बाहेर बोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मॉरिस यांनी त्यांना बाहेर येऊच दिले नाही. शेवटी गोळीबाराचा थरार घडल्याचे प्रविणने सांगितले.
कुटुंबासह कुलू मनालीला फिरायला जायचं ठरलं पण नियतीने वेगळाच डाव साधला
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे आपल्या पत्नी आणि मुलांसह आज (शुक्रवारी) कुलू मनालीला फिरायला जाणार होते. त्यांनी कुलू मनालीला जाण्यासाठी आजच्या फ्लाईटचं बुकिंग करण्यात आलं होतं. 14 फेब्रुवारीला अभिषेक घोसाळकर आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. तो साजरा करण्यासाठी अभिषेक घोसाळकर सहकुटुंब कुलु मनाली येथे जाणार होते. कुलू मनालीला निघण्याची पूर्ण तयारी झाली होती. मात्र निघण्याच्या आदल्याच रात्री मॉरिसने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली, असे वृत्त न्यूज 18 लोकमतने दिले आहे.
घोसाळकरांची हत्या मॉरिसनेच केली
मॉरिस यानेच माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. फेसबुक लाईव्हच्या वेळी फक्त मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर ऑफिसमध्ये होते, तर बाहेर 5-6 लोक बसले होते. गोळ्या झाडल्यानंतर अभिषेक घोसाळकर हा काचेचा दरवाजा तोडून बाहेर आले, त्यानंतर बाहेर बसलेल्या लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले. या घटनेमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. गुन्हे शाखेच्या दोन युनिट्सचे अधिकारी संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.
मॉरिसचा आत्महत्येचा पहिला प्रयत्न फसला
मुंबई क्राईम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, मॉरीसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर एकूण 5 गोळ्या झाडल्या होत्या, त्यापैकी 3 गोळ्या घोसाळकर यांच्या शरिरातून आरपास गेल्या. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळी झाडल्यानंतर मॉरिसने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुलातून गोळी झाडली गेली नाही. यानंतर तो वरच्या मजल्यावर धावत गेला आणि तिथेच स्वत:वर गोळी झाडली. मॉरिसने ज्या पिस्तुलाने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या घातल्या त्या पिस्तुलाचा परवाना प्रयागराजच्या फुलपूर पोलिसांनी जारी केला आहे. मात्र, माॅरिसच्या अंगरक्षकाने मुंबईत त्याची नोंद केलेली नाही, त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीसोबतही वाद
आतापर्यंतच्या तपासानुसार, मॉरिसविरुद्ध तीन गुन्हे उघडकीस आले असून त्यापैकी एक बलात्काराचा, दुसरा दरोड्याचा आणि तिसरा विनयभंग आणि धमकीचा आहे. मॉरिसचे काही महिन्यांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांच्याशीही भांडण झाले होते. याप्रकरणी गुन्हे शाखा सध्या 10 जणांची चौकशी करत आहे.
आधी विश्वास संपादन केला आणि वेळ येताच काटा काढला
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागची धक्कादायत कारणं आता समोर येत आहेत. बदल्याची भावना, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्यासाठी हा खून झाला असं पोलीस तपासातून स्पष्ट होतंय. मारेकरी मॉरिसनं अतिशय थंड डोक्यानं हत्येचा प्लॅन बनवला. त्यासाठी आधी भांडण असलेल्या अभिषेक घोसाळकरांशी जवळीक वाढवली, त्यांच्या विश्वास जिंकला आणि मग त्या भयावह क्षणी घोसाळकरांचा जीव घेतला. हे सगळं एखाद्या क्राईम वेब सीरिजच्या वेब सीरिजपेक्षाही भयानक आहे. राग आणि सूड या दोन भावना किती मोठा घात करू शकतात, हे या हत्येमधून पुन्हा अधोरेखित झालं.
तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
घोसाळकर हत्याकांड प्रकरणात वापरण्यात आलेले पिस्तुल अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याचे होते. मिश्रा याने घटनेच्या दिवशी स्वतःचे परवाना असलेले पिस्तुल सोबत न ठेवता मॉरीस याच्या कार्यालयात ठेवून आईला रुग्णालयात बघण्यासाठी गेला होता. मिश्रा याने भारतीय हत्यार कायदा कलम २९ (ब) ३० नियमाचे भंग केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुन्हे शाखेने गोळीबार प्रकरणी शुक्रवारी मॉरिस नोरोन्हा याचे सहकारी मेहुल पारेख, रोहित साहू आणि अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा यांना ताब्यात घेतले आहे.
शोकाकुल वातावरणात अभिषेक घोसाळकर यांच्यावर अंत्यसंस्कार
गोळीबारात मयत झालेले शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर शुक्रवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या धाकट्या भावाने त्यांना अग्नी दिला. शुक्रवारी अभिषेक यांचे पार्थिव घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. यावेळी अभिषेक घोसाळकर यांची आई, पत्नी आणि मुलीने टाहो फोडला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांना देखील अश्रू अनावर झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते आदींनी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून अंतिम दर्शन घेतले. दुपारी 4.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर दौलत नगर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
“अमर रहे अमर रहे, अभिषेक भाई अमर रहे”, ” जब तक सूरज चांद रहेगा , अभिषेक तेरा नाम रहेगा”,
यावेळी, आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधीला निरोप देण्यासाठी अभिषेक घोसाळकर यांचे हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी आदींनी मोठ्या संख्येने घराजवळ, अंत्ययात्रेत आणि रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. पोलिसांनी घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता. अंत्ययात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी घोसाळकर यांच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. “अमर रहे अमर रहे, अभिषेक भाई अमर रहे”, ” जब तक सूरज चांद रहेगा , अभिषेक तेरा नाम रहेगा”, अशा घोषणा देत भावपूर्ण वातावरणात, साश्रू नयनांनी अभिषेक घोसाळकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
तत्पूर्वी, शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे, नेते संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, आमदार अनिल परब, आमदार विलास पोतनीस, आमदार सुनील प्रभू, नेते व माजी मंत्री सुभाष देसाई, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, काँग्रेस आमदार भाई जगताप, माजी नगरसेवक व विभागप्रमुख तुकाराम पाटील, माजी नगरसेवक हर्षद कारकर, बाळकृष्ण ब्रीद यांनी घोसाळकर यांच्या बोरिवली येथील निवासस्थानी भेट देवून घोसाळकर कुटुंबीयांचे सांत्वन केले व अभिषेक यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.
अभिषेक यांना निरोप देताना अश्रूंचा बांध फुटला
अभिषेक यांचा पार्थिव अंतिम संस्काराला स्मशानात नेण्यापूर्वी त्यांच्या “औदुंबर”या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवला होता. यावेळी, अभिषेक या आपल्या लाडक्या पुत्राला निरोप देताना पिता विनोद घोसाळकर हे घरात, बाहेर अगदी स्मशानातही ढसाढसा रडले. काही केल्या त्यांचे अश्रू त्यांना आवरणे कठीण झाले होते. अशीच काहीशी अवस्था अभिषेक यांच्या आई व पत्नी तेजस्विनी आणि त्यांची मुलगी यांची झाली होती. त्याचप्रमाणे, शोकाकुल व नीरव शांततापूर्ण वातावरणात अभिषेक यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक, शिवसेना पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुणी यांनाही आपल्या डोळ्यातील अश्रू आवरता आले नाहीत. घोसाळकर यांच्या निवासस्थानी जणू काही अश्रूंचा बांध फुटला होता.
या लोकप्रतिनिधींनीही घेतले अंतिम दर्शन
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील शिंदे, रमेश कोरगावकर, प्रकाश फातरपेकर, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड,माजी गटनेत्या राखी जाधव, युवा सेनेचे वरुण सरदेसाई, अमोल कीर्तिकर, अंकित प्रभू, माजी नगरसेवक संजय घाडी, माजी सभगृह नेत्या विशाखा राऊत, माजी नगरसेवक संजना घाडी, सदानंद परब, विभाग प्रमुख उदेश पाटेकर, सुजाता शिंगाडे, शीतल शेठ-देवरूखकर, माजी नगरसेवक मिलिंद वैद्य, उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी-शिवसैनिक आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.