Abhishek Ghosalkar Murder Case : शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या तर आरोपी माॅरिसची आत्महत्या, फेसबुक लाईव्ह सुरु असताना नेमकं घडलं काय ? घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Abhishek Ghosalkar Murder Case : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मुंबईतील दहिसर (dahisar) भागात गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली. या हत्येचा थरार फेसबुक लाईव्हद्वारे (facebook live) समोर आला आहे. शिवसेनेच्या (Thackeray Shiv sena) युवा नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने महाराष्ट्रात (Maharashtra) मोठी खळबळ उडाली आहे. अभिषेक घोसाळकर (Abhishek ghosalkar) यांची हत्या करणारा माॅरिस (Mauris Naronha) याने स्वता:वर गोळ्या झाडून आत्महत्या (sucied) केली आहे. घोसाळकर हत्याकांड प्रकरणावर राजकीय व सामाजिक क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा प्रसंग एका प्रत्यक्षदर्शी महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितला, यावेळी ती महिला म्हणाली की, आम्हाला दुपारी ३ वाजता फोन आला की सर्व महिलांनी कार्यालयात या. गणपत पाटील नगर येथे शिवसेनेचे कार्यालय आहे. तिथे आम्हाला बोलावलं होतं. पण आम्हाला का बोलावलं आहे, हे माहीत नव्हतं. तिथे आम्ही दोन तास बसलो. मग आम्हाला आयसी कॉलनीच्या शाखेत बोलावलं गेलं. तिथंही आम्ही दीड तास बसलो. तिथे गेल्यावर कळलं की मॉरिस महिलांना साड्या देणार आहे. पण तिथे दोन मिनिटांसाठी अचानक लाईट्स गेले. त्यावेळी आम्ही शाखेत बसलो होतो, तर मॉरिस बाहेर उभा होता.
त्या पुढे म्हणाल्या की, मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या कार्यालयात बोलावलं. शाखा आणि मॉरिसचं कार्यालय जवळ आहे. पण पुन्हा ते शाखेत आले. पुन्हा मॉरिस म्हणाले की मुलाखत घ्यायची आहे, कार्यालयात या. त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांच्याबरोबर प्रवीण नावाचा कार्याकर्ताही गेला. तो भाईंना (घोसाळकर) बोललाही की काय जायचं? पण तरीही घोसाळकर तिथे गेले. थोड्याच वेळात प्रवीण बाहेर आला आणि म्हणाला भाईला (घोसाळकर) गोळी मारली. गोळी मारल्याचं कळताच सर्व बायका पळाल्या. त्यांना वाचवायला कोणीच पुढे येईना. प्रवीणने त्यांना धरून बाहेर आणलं. मग आम्ही त्यांना धरून रिक्षापर्यंत नेलं. परंतु, एकही रिक्षाचालक रुग्णालयात जायला तयार होत नव्हता. अखेर एका रिक्षावाल्याला आम्ही तयार केलं आणि रिक्षातून आम्ही करुणा रुग्णालयात त्यांना नेलं.
“आधी त्यांना रुग्णालयात न्या, मग मारेकऱ्यांना शोधा असं मी त्यांना म्हणत होते. पण मॉरिस कुठे पळाला हे कळलं नाही. त्या रस्त्याला अंधार असतो त्यामुळे काही दिसलं नाही”, असंही प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
प्राप्त माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर यांच्यावर आज 8 रोजी रात्री 7.45 वाजताच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना त्याच्याच कार्यालयात एका कार्यक्रमासाठी बोलावलं होते. यावेळी अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिससोबत फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. संवाद संपल्यानंतर आधी मॉरिस फेसबूक लाइव्हमधून निघून गेला. त्यानंतर अभिषेक घोसाळकर उठून जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. फेसबुक लाइव्हमध्ये गोळ्यांचा आणि अभिषेक घोसाळकर यांच्या ओरडण्याचा आवाज येत आहे. धक्कादायक म्हणजे गोळीबार झाल्यानंतरही फेसबूक लाइव्ह पाऊणतास सुरूच होते.
फेसबुक लाइव्हमध्ये दिसत आहे की, मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यातील 3 गोळ्या अभिषेक यांना लागल्या. त्यांना तत्काळ करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी माॉरिसने स्वत:वरही चार गोळ्या झाडत आत्महत्या केली. शिवसेना नेत्याच्या हत्येने मुंबई शहर हादरून गेलं आहे.
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. मुरीस भाई नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणतो. एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जातंय.
अभिषेक घोसाळकर हे कायम चर्चेत राहिले होते. विनोद घोसाळकर यांची सून आणि त्यांचा मुलगा हे नगरसेवक राहिले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते रिक्युअर बोर्डाचे ते सदस्य होते. राजकीय वाद आणि आर्थिक वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाचा मुंबई पोलिस अधिक तपास पोलीस करत आहे.
कोण आहेत अभिषेक घोसाळकर?
अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत. अभिषेक घोसाळकर हे दोनदा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. दहिसरमधील तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अभ्यासू आणि तळमळीने काम करणारा नगरसेवक म्हणून त्यांची प्रतिमा आहे. घोसाळकर हे दहिसर कांदरपाडा वॉर्ड नंबर 7 चे नगरसेवक होते. सध्या हा वॉर्ड शितल म्हात्रे यांच्याकडे आहे. सध्या घोसाळकर यांची पत्नी वॉर्ड नंबर 1 ची नगरसेविका होती.
कोण आहे मॉरिसभाई ?
गुंड मॉरिस (Mauris Naronha) हा बोरिवली पश्चिमेच्या आयसी कॉलनीत राहत आहे. समाजसेवक मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाई म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याच्यावर बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. एका महिलेची 88 लाखाची फसवणूक केली आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप असल्याचं सांगितलं जातं. या महिलेला त्याने धमकीही दिली होती. धमकीचा कथित व्हिडीओही व्हायरल झाला होता. एवढेच नव्हे तर कोर्टात जात असताना त्याने पत्रकारांनाही धमकावल्याचं सांगितलं जात आहे. तसेच मॉरिसभाईने वॉर्ड नंबर 1 मधून महापालिकेची निवडणूक लढवल्याचं सांगितलं जातं.
फेसबुक लाईव्ह मॉरीस-अभिषेक शेजारीच बसले अन् काही कळायच्या आत
फेसबुक लाईव्ह मध्ये दिसत असलेल्या व्हिडिओत मॉरीस भाई हा अभिषेक घोसाळकर यांच्या बाजूला बसला होता. यावेळी मॉरीस भाई बोलताना दिसत आहे. अनेक लोकांना आश्चर्य वाटेल. जी गोष्ट युनिटीसाठी होते. आयसी कॉलनीच्यासाठी होत आहे. आपण एकत्र आलो पाहिजे. चांगलं काम केलं पाहिजे. आज आम्ही ठरवलंय की साडी वाटायची, रेशन वाटायचं, अभिषेकभाई आणि आम्ही नाशिक ट्रिपच्या बसेस करायचं ठरवलं आहे, असं मॉरीसभाई म्हणतो.
त्यानंतर अभिषेक घोसाळकर बोलताना दिसत आहेत. आता कसं आहे की, आताच आपण सांगितलं की आपण एकत्र येणार आहोत. त्यामुळे चांगला दृष्टीकोण ठेवून आणि एकत्रित रित्या राहून एक चांगलं काम करायचं आहे. (मॉरीस भाई उठून जातो) मला वाटतं आपण चांगल्या कारणाने पुढे गेलं पाहिजे. लोकांचं भलं पाहिलं पाहिजे. लोकांचा फायदा कोणत्या गोष्टीत आहे हे आपण पाहिलं पाहिजे. मला वाटतं आज एक चांगला निर्णय मॉरीस भाईने घेतला आहे. आज साडी, फळ आणि धान्य वाटण्याचं काम करण्यात येणार आहे, असं अभिषेक घोसाळकर म्हणतात.
तेवढ्यात मॉरीस भाई येतो. आणि आम्ही दोघं हे एकत्रितपणे करणार असल्याचं म्हणतो. त्यावर अभिषेक स्मित हास्य करताना दिसत आहेत. त्यानंतर अभिषेक घोसाळकर उभं राहायला उठतात. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि आनंद दिसतो. मोबाइलकडे पाहत असतानाच अचानक त्यांना अत्यंत जवळून चार गोळ्या मारण्यात आल्या. त्यांच्या पोटावर गोळ्या लागल्या.
गोळी लागताच त्यांनी पोटाला हात लावला आणि मोबाइल खुर्चीवर ठेवून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मन विचलित करणारा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून महाराष्ट्र मोठी खळबळ उडाली आहे.