Adventure sports tourist : साहसी क्रीडा पर्यटकांनो सावधान, नोंदणी करा अन्यथा दंडाला सामोरे जा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Adventure sports tourist । साहसी क्रिडा पर्यटन करणाऱ्या पर्यटकांना यापुढे उपक्रम आयोजित करताना सहभागी होणाऱ्या सर्वांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी न करता, साहसी उपक्रम आयोजित केल्यास पंचवीस हजार रुपयांचा दंड, साहित्य जप्ती तसेच आयोजकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो असा इशारा पर्यटन संचालनालय नाशिक कार्यालयाने दिला आहे.

Adventure sports tourists beware, register or face fines

गिर्यारोहण, रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, पॅराग्लायडिंग, बोटिंग इ. विविध क्रीडा प्रकाराचे साहसी पर्यटन राज्यभरात वेगवेगळ्या संस्था आणि व्यक्तींकडून राबवले जातात. उपक्रमाचे आयोजक असे उपक्रम आयोजित करण्याबाबत प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्याकडे असणारे साहित्य दर्जेदार आहे का, उपक्रम आयोजित करतेवेळी पुरेशा सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत का, याची खातरजमा आयोजकांनी करणे आवश्यक आहे.

शासनाने अशाप्रकारचे साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्यांसाठी नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक विभाग यांच्या कार्यालयाद्वारे नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांमधील  साहसी उपक्रम आयोजित करणा-या व्यक्ती अथवा संस्था यांना www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सुरुवातीला तात्पुरती नोंदणी करावी. त्यासाठी पाचशे रुपये प्रती साहसी प्रकार शुल्क आकारण्यात येणार आहे. तात्पुरती नोंदणी झाल्यानंतर एक वर्षानंतर अंतिम नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. नोंदणी न करता, साहसी उपक्रम आयोजित केल्यास पंचवीस हजार रुपये दंड, साहित्य जप्ती तसेच आयोजकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे.

साहसी पर्यटन उपक्रम धोरण व ऑनलाईन अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्राम गृह आवार, गोल्फ क्लब मैदानाजवळ, नाशिक-४२२००१, दु. क्र.- (०२५३) २९९५४६४ / २९७००४९, ई-मेल ddtourism.nashik-mh@gov.in येथे संपर्क साधावा असे, अवाहन नाशिकच्या पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालकांनी केले आहे.