राष्ट्रवादीनंतर काँग्रेसला जामखेडमध्ये भगदाड, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकाची राजीनाम्याची घोषणा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कर्जत जामखेड मतदारसंघात सध्या पक्षांतराचे वारे जोरात सुरु आहे. मागील अडीच वर्षांत भाजपातून अनेकांनी राष्ट्रवादीची वाट धरली होती. परंतू राज्यात सत्तांतर होताच महाविकास आघाडीतील घटक पक्षातून आऊटगोईंग सुरु झाले आहे. विशेषता: राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये याचे लोण पसरले आहे. दोन दिवसांपुर्वी अरणगावात राष्ट्रवादीला भगदाड पडल्यानंतर आज जामखेड शहरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
जामखेड शहरातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते जमीर सय्यद यांनी आज पक्षांच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याची घोषणा आज जामखेडमध्ये पत्रकार परिषद घेत केली. सय्यद हे 22 वर्षांपासून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक म्हणून काँग्रेस पक्षात कार्यरत होते. ते गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते. आज त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय जाहीर केला.
गेल्या बावीस वर्षापासून काँग्रेस पक्षात इमानेइतबारे काम केले, कधी पदाची अपेक्षा ठेवली नाही. सध्या जिल्हा काँग्रेस कमिटीत काही कान फुकणारे नेते आहेत. यामुळे काम करणाऱ्या माणसाला किंमत नाही. काँग्रेस खिळखिळी करण्याचे काम हि मंडळी करत आहे. तालुक्यात दलबदलू व चंपोगिरी करणाऱ्यांना पदे दिले आहेत. मला विश्वासात न घेता पदे दिली जातात. माझी काँग्रेस पक्षात घुसमट होत होती म्हणून मी आज सर्व पदाचा राजीनामा देत आहे अशी घोषणा जमीर सय्यद यांनी आज केली
काँग्रेस पक्षात सध्या पक्षात सक्रीय कसलीही किंमत नाही, जिल्हा काँग्रेस कमिटीत काही कान फुकणारे नेते यामुळे काम करणाऱ्या माणसाला किंमत नाही. काँग्रेस खिळखिळी झाली आहे. अनेक लोक कान फुकण्याचे काम करतात. यामुळे पक्ष रसातळाला गेला आहे. माझे शहराध्यक्ष पदावरून चौकशी करून पद काढायला हवे होते. पण तसे काही केले नाही. श्रेष्ठी लक्ष देत नाही
मला काँग्रेस शहराध्यक्ष पदावरून अचानक काढले. २२ वर्षाच्या निष्ठेला तिलांजली दिली. विचारले नाही. काल पक्षात आलेल्या चंपोगिरी करणार्यांचे ऐकून पदावरून दूर केले. शहरात सात हजार मुस्लिम मतदार आहेत. यांचा फक्त ओट बॅक म्हणून माझा वापर करून घेतला.माझी पक्षात मोठी घुसमट होत होती. यामुळे राजीनामा देत आहे असे त्यांनी जाहीर केले. मित्र मंडळी कार्यकर्ते यांच्याशी विचारविनिमय करून लवकरात लवकर पुढील निर्णय घेणार असल्याचे जमीर सय्यद यांनी सांगितले.
कोण आहेत जमीर सय्यद ?
जमीर सय्यद सन २०००पासून काँग्रेस पक्षात सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत होते. त्यांनी आतापर्यंत युवक काँग्रेस शहराध्यक्ष सहा वर्षे, सेवा दल काँग्रेस अडिच वर्षे तालुकाध्यक्ष, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष तीन वर्षे, आय काँग्रेसचे शहराध्यक्ष, कर्जत जामखेड सोशल मीडिया प्रमुख प्रदेश सदस्य म्हणून काम केले आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.