खरिप नुकसान भरपाईबाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे मोठे वक्तव्य, 15 लाख हेक्टरवरील पिके पाण्यात, शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे तब्बल 15 लाख हेक्टरहून अधिकच्या क्षेत्रावरील खरिप पिके पाण्यात गेली आहेत. राज्यात ओल्या दुष्काळाची घोषणा करावी अशी मागणी होत आहे. अश्यातच नुकसान भरपाई बाबत राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी आज मोठे वक्तव्य केलं आहे.
राज्यात ओल्या दुष्काळाची घोषणा करावी अशी मागणी विधीमंडळात विरोधकांनी केली आहे. मात्र, ओल्या दुष्काळासारखी स्थिती नाही. शिवाय त्यासाठी वेगळे नियमही असतात असे (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते. पण नुकसानभरापाईबाबत आता सोमवारी निर्णय घेतला जाणार असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.
शिवाय दोन दिवसांमध्ये राज्यातील पीकांची पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार मदतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मदतीची वाटप नेमकी केव्हापासून सुरु होणार याबाबत मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्री म्हणून मी सोमवारी सभागृहात घोषणा करणार असल्याचे सत्तार यांनी नागपुरात सांगितले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईबाबत शेतकऱ्यांना सोमवारी दिलासा मिळेल असे चित्र आहे.
गेल्या दीड दोन महिन्यापासून राज्यात अतिवृष्टी आणि सततचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे खरिपातील पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण फळबागाही आडव्याच आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी विरोधक आक्रमक आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. घोषणा झाली पण प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हा होणार असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत सोमवारी घोषणा केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर नेमकी कधी रक्कम जमा होणार याबाबत सांगितले जाणार असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.
कृषी खात्याचा पदभार घेतल्यानंतर अब्दुल सत्तार हे प्रथमच विदर्भात दाखल झाले आहेत. यंदा सर्वाधिक पाऊस हा याच विभागात झाला असून धान पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आता भरपाईबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. जिरायतील हेक्टरी 13 हजार 600 अशी रक्कम ठरवण्यात आली आहे. मात्र, त्यानुसार मदत मिळणार आहे. मदत निधीपूर्वी कृषी मंत्री हे पीक पाहणीसाठी विदर्भात दाखल झाले आहेत सत्तार हे नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.