जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुणे, 30 जून 2023 : महाराष्ट्रात जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. काही भागातील पेरण्या अजूनही रखडलेल्या आहेत. बिपरजाॅय चक्रीवादळ व अल निनोचा परिणाम महाराष्ट्राच्या मान्सूनवर यंदा दिसून येत आहे.
राज्यात जून अखेर सरासरीच्या 53 टक्के पाऊस झाला आहे. तर 5.25 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. जूनमध्ये कोकणात सर्वाधिक तर नाशिक विभागातील काही भागात मध्यम तर पुणे अमरावती, औरंगाबाद, नागपूर विभागात हलका पाऊस झाला आहे, अशी माहिती राज्याचे कृषि आयुक्त सुनिल चव्हाण (Sunil Chavhan IAS) यांनी दिली.
मागील आठवड्यात पेरण्यांची घाई करू नये असे कृषि विभागाने म्हटले होते, परंतू राज्यात मागील आठवडाभरापासून काही भागात चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे रखडलेल्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. अजूनही काही भागाला दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. मागील वर्षी जून महिन्यात 31 टक्के म्हणजेच 16.92 लाख हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या. चालू वर्षांत जून महिन्यात अवघ्या 3.70 टक्के म्हणजेच 5.25 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.
राज्याचं सरासरी पेरणी क्षेत्र 142 लाख हेक्टर आहे. गतवर्षी 16.92 लाख हेक्टरवर खरिप पेरणी झाली होती. तर यंदा अवघी 5.25 लाख हेक्टरवर झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस झालेला नाही यामुळे अनेक भागात पेरण्या रखडल्या आहेत. ज्या भागात जेमतेम पाऊस झालाय तिथे आहे त्या ओलीवर पेरण्या करण्यात आल्या आहेत. यामुळे येत्या जूलै महिन्यात महाराष्ट्रात दमदार पाऊस होणार का याकडे राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.