जामखेड टाइम्स वृत्तसेवा : बीड आणि पर्यायाने मराठवाड्याच्या विकासाची गंगा ज्या अहमदनगर- परळी रेल्वेमार्गाच्या उभारणीतून अवतरणार आहे, त्या प्रकल्पातील अहमदनगर ते आष्टी रेल्वेमार्गाचे काम पुर्ण झाले आहे. या मार्गावर हायस्पीड रेल्वेची चाचणीसुध्दा झाली आहे. त्यामुळे आष्टी अहमदनगर पुढे पुणे – मुंबई रेल्वे सुरू होणार याची उत्सुकता आष्टीकरांना लागली होती परंतू अजूनही ही रेल्वे सुरू झालेली नाही. अहमदनगर रेल्वेस्थानकावर ही रेल्वे धुळ खात पडून आहे.
अहमदनगर आणि बीड जिल्हावासियांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेली अहमदनगर- आष्टी रेल्वे (Ahmednagar Ashti Railway) उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. 67 किलोमीटर अंतराच्या या रेल्वेची चाचणी होऊन देखील अजूनही रेल्वे सुरू झालेली नाही.दहा कोटी रुपयांचे नगर-आष्टी रेल्वेचे इंजिनसह 10 डब्बे अहमदनगर रेल्वे स्थानकावर धूळखात पडून आहेत.
अहमदनगर रेल्वे स्थानकावर दहा डब्ब्यांची रेल्वे अक्षरशः धूळखात पडलीय. ही रेल्वे अहमदनगर ते आष्टी या मार्गवर धावणार असून, दोन ते तीन वेळा चाचणी होऊन देखील ही रेल्वे मागील तीन महिन्यांपासून अहमदनगर रेल्वे स्थानकावरच उभी आहे.
अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाची लांबी 261 किलोमीटर आहे. अहमदनगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झालंय. या रेल्वेची चाचणी देखील पूर्ण झाली आहे. परंतु, प्रत्यक्षात या मार्गावर रेल्वे काही सुरू झाली नाही. चाचणी पूर्ण झाल्यामुळे मागच्या तीन महिन्यांपासून अहमदनगर-आष्टी रेल्वेचे उद्घाटन कधी होणार याविषयी चर्चा होती आहे. तीन वेळा तारीख जाहीर होऊन देखील उद्घाटन झालेलं नाही.
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग कायम बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलाय. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासंदर्भात कायम केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. ही रेल्वे सुरू झाली तर आष्टी आणि अहमदनगरच्या शेतकरी , विद्यार्थी आणि नोकरदारांनाही फायदा होणार आहे. मात्र केवळ काही बड्या नेत्यांना उद्घाटनासाठी मुहूर्त मिळत नसल्याने ही रेल्वे सुरू होत नसल्याचे नागरिक सांगतात.
1995 ला नगर-बीड-परळी रेल्वे मार्गला तत्वतः मंजुरी मिळाली होती. मात्र त्यानंतर अनेक वर्षे राजकीय इच्छाशक्ती अभावी या मार्गाचे काम रखडले होते. सध्या या प्रकल्पाची किंमत चार हजार कोटींच्या पुढे गेलीय. अहमदनगर – आष्टी मार्गही पूर्ण झालाय. पण रेल्वे धावत नाहीय. सरकारने तातडीने या रेल्वेचं उद्घाटन करून रेल्वेसेवा सुरू करावी अशी मागणी जोर पकडू लागली आहे.