जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राष्ट्र उभारणीसाठी शिक्षक हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. संस्कारक्षम भावी पिढ्या घडवण्याची जबाबदारी असलेले शिक्षक गेल्या काही वर्षांत खूप बदलले आहेत. शाळा हा शिक्षकांचा श्वास असायला हवा, परंतू राजकारण हा विषय बहुतांश शिक्षकांचा श्वास बनलाय याचाच प्रत्यय सातत्याने समाजाला येत आहे.
काही वर्षापुर्वी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांच्या आर्थिक स्थैर्यासाठी शिक्षकांनी प्राथमिक शिक्षक बँकेची स्थापना केली. या बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा असो की, निवडणूक यात, राडेबाजी, गोंधळ, अत्यंत टोकाचे आरोप – प्रत्यारोप, हमरी तुमरी या बाबी जिल्हावासियांना नेहमीच्याच झाल्या आहेत. शिक्षकांच्या आदर्शाच्या कहाण्या यातूनच नव्याने लिहिल्या जात आहेत.
नुकतीच शिक्षक बँकेच्या निवडणूकीची धामधुम रंगली होती. प्रचाराचा धुराळा सुरू झाला होता. निवडणूकीसाठी चार पॅनलने दंड थोपटले होते. प्रचार शिगेला पोहचला होता. पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. ढाब्यांवर – हाॅटेलवर गटा गटाने उमेदवारांंचे काही समर्थक रात्रमैफल गाजवत होते.
झिंगलेल्या वातावरण मग विरोधी गट आणि उमेदवारांच्या सात पिढ्यांचा उध्दार होत होता. निवडणुकीचं वातावरण कसं सगळं ओक्केमध्ये सुरू होतं, पण अचानक माशी शिंकली आणि निवडणूकच रद्द झाली. जिल्ह्यातील शिक्षकांंचे तापलेले राजकीय वातावरण पार थंडावले आणि पेेटलेले मास्तर पार हिरमुसून गेले.
राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो असा अहवाल दिल्यानंतर सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जूलै महिन्यात होणाऱ्या निवडणूका 30 सप्टेंबर 2022 पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. याचा फटका जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीला बसला आहे.
बँकेच्या 21 जागेसाठी 24 जूलैला मतदान तर 25 जूलैला मतमोजणी होणार होती. या निवडणुकीत सत्ताधारी गुरुमाऊलीचे नेते बापूसाहेब तांबे, रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली, डॉ. संजय कळमकर यांचे गुरुकुल आणि राजेंद्र शिंदे आणि एकनाथ व्यवहारे यांचे सदिच्छा व इब्टाची आघाडी अशी चौरंगी सामना रंगला होता.
कोरोना महामारीनंतर यंदा शाळा गजबजून गेल्या आहेत. शाळा सुरू होऊन काही दिवस होत नाही, तोच शिक्षकांंचे लक्ष बँकेच्या राजकारणात गुंतले. गेल्या काही दिवसांत जामखेड तालुक्यात शिक्षक संघटनांचे मेळावे – शक्तीप्रदर्शन पार पडले. भाषणबाजीतून टीकेचे बाण ताणले गेले.
पण आता निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता गुरूजी शाळेत पुन्हा लक्ष घालतील, अशी अपेक्षा पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे ; मात्र राजकारणी शिक्षकांना ही जबाबदारी इमानदारीने पार पाडणे जमेल का ? याबाबत मात्र उलटसुलट चर्चा सुरू आहे.