अकोला : अकोल्यातील (Akola) पातूर तालुक्यातील विवरा येथील २५ वर्षाच्या युवकाला मृत घोषित करून त्याला अंतिम संस्कारासाठी घेऊन जात असताना हा युवक तिरडीवरून उठून बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेची बातमी राज्यभरात वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली होती. मात्र आता या प्रकरणात वेगळेच सत्य पोलिसांनी शोधून काढले आहे.
तिरडीवरून उठलेल्या त्या युवकाला पाहण्यासाठी लोकांनी त्याच्या घरासमोर मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसही विवरा गावात दाखल झाले होते. तो तरूण खरचं मृत झाला होता की, सर्व बनाव होता. असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये होते. त्या सर्व प्रश्नांचा पोलिसांनी मोठ्या शिताफीने उलघडा केला आहे.
दरम्यान, काल अत्यसंस्कार (Funeral) करायला जाताना एक मृृत तरुण चक्क तिरडीवर उठून बसला आणि तो गप्पा मारायला लागला, ही थक्क करणारी घटना उघडकीस आली होती. मात्र हा सर्व प्रकार एका कथित महाराजाने स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी घडवून आणला होता. हा सर्व बनाव महाराजाने घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्या कथित महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश महाराज गोरले असं त्या मांत्रिकाचं नाव आहे. रात्री उशिरा चान्नी पोलिसांनी (Channi Police) कथित महाराजावर गुन्हा दाखल केला आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातल्या (Patur Taluka) विवरा गावातील प्रशांत मेसरे नामक तरूणाचा मृत्यू झाल्याचे सांगत गावातून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती.
अंत्ययात्रेदरम्यान मी त्याला जिवंत करतो असं म्हणत एका मांत्रिकाने त्याला जिवंत केल्याचा दावा केला होता. पोलिसांनी (Police) या प्रकरणी प्रशांतच्या कुटुंबियांच्या जबाब नोंदवला आहे. दरम्यान या प्रकरणी आता चान्नी पोलिसांनी गणेश महाराज मंत्रिकावर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. शिवाय असे प्रकार पुन्हा घडू नयेत आणि अशा स्वयंघोषित मांत्रिकांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलं आहे.