जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. पहिल्या टप्प्यात 18 जणांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मंत्रीमंडळाचा शपथविधी होताच भाजपाच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. (As soon as the shinde cabinet was expanded, BJP leader Chitra Wagh was furious)
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे गटाकडून 9 जणांनी तर भाजपकडून 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे गटाकडून यवतमाळ जिल्ह्यातील आमदार संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागली. पुजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूमुळे संजय राठोड यांना ठाकरे सरकारमधून डच्चू देण्यात आला होता. परंतू संजय राठोड यांची शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागली आहे.
पुजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूमुळे संजय राठोड अडचणीत आले होते. राठोड यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी यासाठी भाजपकडून रान पेटवण्यात आले होते. ठाकरे सरकारला भाजपच्या दबावामुळे राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला होता. विशेषता : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात मोठी मोहिम उघडली होती. मयत पूजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
परंतू संजय राठोड यांचा शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश होताच भाजप नेत्या चित्रा वाघ संतापल्या आहे. त्यांनी यासंबंधी एक व्हिडीओ जारी करत राठोडांविरोधात जोरदार आगपाखड केली आहे.
संजय राठोड हा मंत्री जरी झाला असला तरी….
यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, महाराष्ट्रातली आपली भगिनी पूजा चव्हाण हिच्या मृत्यूला कारणीभूत असणारा माजी मंत्री संजय राठोड याचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात झालेला समावेश हा अत्यंत दुर्दैवी असा आहे. संजय राठोड हा मंत्री जरी झाला असला तरी त्याच्याविरुद्धचा माझा लढा हा मी सुरूच ठेवणार आहे. न्याय देवतेवर मला पुर्ण विश्वास आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत, लढेंगे भी और जितेंगे भी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
18 जणांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज सकाळी राजभवनात पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 18 नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. संदीपान भुमरे, उदय सामंत, दिपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दादा भूसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, संजय राठोड, गिरीष महाजन, चंद्रकात पाटील, रविंद्र चव्हाण, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, विजयकुमार गावीत, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, राधाकृष्ण विखे-पाटील यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.