Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार की लांबणीवर जाणार : आज निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : देशातील चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची आज (दुपारी 3 वाजता) महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. यात जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या चार राज्यांच्या निवडणूकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुदत संपणाऱ्या या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात येणार आहेत. परंतू महाराष्ट्राची निवडणूक लांबणीवर जाणार अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. यंदा कधी मतदान होणार? हे निवडणूक आयोग आज जाहीर करणार आहे.
कोणत्या राज्यात किती जागा
महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. झारखंड विधानसभेत 81 सदस्य आहेत. या राज्यात 2019 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. हरियाणामध्ये 90 जागा आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे राज्य विभागले गेले आहे. याआधी 2014 मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती.
काश्मीरमध्ये 90 जागांवर होणार मतदान
जम्मू-काश्मीरमध्ये बराच काळापासून विधानसभा निवडणुका होऊ शकल्या नाहीत. मे 2022 च्या परिसीमनानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेच्या जागांची संख्या आता 90 झाली आहे. त्यात जम्मूमध्ये 43 विधानसभा जागा तर काश्मीरमधील 47 विधानसभा जागा आहेत. 2014 मध्ये, लडाखमधील 6 जागांसह जम्मूमधील 37 जागा आणि काश्मीर खोऱ्यातील 46 जागांसह 87 विधानसभा जागांवर निवडणुका झाल्या होत्या.
9 ऑगस्ट रोजी मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार यांनी अपल्या टीमसह जम्मू-कश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळेस त्यांनी लवकरच निवडणुका होणार असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयानेही जम्मू-कश्मीरमध्ये 30 सप्टेंबर 2024 पर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.
महाराष्ट्राची निवडणूक लांबणीवर ?
महाराष्ट्राची निवडणूक लांबणीवर पडणार असल्याची चर्चा महाराष्ट्रात आहे. यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे, त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबणार यावर आज अधिकृत शिक्कामोर्तब ? आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, ज्या राज्यांमध्ये निवडणूक अपेक्षित आहे त्यात हरियाणा झारखंड महाराष्ट्र जम्मू काश्मीर चा समावेश आहे पण आज महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होणार नाही अशी माहिती आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 28 नोव्हेंबर पर्यंत आहे.. दिवाळी 1 ते 3 नोव्हेंबर च्या दरम्यान आहे कदाचित दिवाळीनंतर महाराष्ट्रात मतदान होण्याची शक्यता. असे चिमटे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे. चिवटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक लांबणीवर पडणार जवळपास स्पष्ट आहे. परंतू आयोगाचे घोषणेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.