Baba Siddique latest News : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बाबा सिद्दीकी मृत्यू प्रकरणी दोन हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात, नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

Baba Siddique latest News in marathi  :  महाराष्ट्राच्या राजकारणात (maharashtra politics) खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ncp) जेष्ठ नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी (baba Siddiqui) यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार (firing) करण्यात आला.या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना वांद्रे पुर्व ( Bandra East Khair Nagar) भागातील खैर नगर परिसरात घडली.या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री मुंबईत गोळीबार करण्यात आला. फटाक्यांच्या आवाजाचा फायदा उचलत हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर बेछूट गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर तीन चार राऊंड फायर करण्यात आले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या छातीत गोळी घुसल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने मुंबई सह महाराष्ट्र हादरून गेला आहे.

माजी मंत्री बाबा सिद्दीकी हे आपले पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर थांबले होते. त्यावेळी तिघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या घटनेत ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डाॅक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता. ही घटना बांद्रा पूर्वेतील खैर नगर परिसरात घडली. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेचा पुढील तपास निर्मलनगर पोलिस करत आहेत.

दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास करत दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील एक जण हरियाणाचा असून दुसरा उत्तर प्रदेशचा आहे. तिसरा आरोपी फरार असून त्याचा वेगाने शोध घेतला जात आहे,अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे. हा हल्ला का करण्यात आला ? कोणी घडवून आणला ? या घटनेमागचा मास्टर माईंड कोण ? याचा मुंबई पोलिस वेगाने शोध घेत आहेत.

काही दिवसांपुर्वी माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा बहाल केली होती. असे असूनही त्यांच्यावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी, अभिनेता संजय दत्त, भाजपा नेते आशिष शेलार, मोहित कंबोज, अजित पवार गटाचे नेते व कार्यकर्ते रूग्णालयात दाखल झाले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Baba Siddiqui : फटाक्यांची आतिषबाजी आणि हल्लेखोरांनी डाव साधला

शनिवारी रात्री माजी मंत्री बाबा सिद्दीकी हे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर थांबलेले होते. दसऱ्यानिमित्त दुर्गामातेची मिरवणूक या भागात सुरु होती. त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी सुरु होती. याच संधीचा फायदा उचलत मोटारसायकलवरून आलेल्या तिघा हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर बेछूट गोळीबार केला. तिघांचे चेहरे रुमालाने बांधलेले होते.यावेळी सिद्दीकी यांच्यावर तीन राऊंड फायर करण्यात आले. त्यातील एक गोळी त्यांच्या छातीत घुसली. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना खैर नगर भागातील राम मंदिर परिसरात घडली.

नेमकं काय घडलं ?

  • माजी मंत्री बाबा सिद्धिकी हे 9.15 मिनिटांच्या दरम्यान कार्यालयातून बाहेर पडले
  • बाबा सिद्धीकी हे कार्यालयाजवळ फटाके वाजवत असताना गोळीबार झाला
  • फटाके फुटत असताना अचानक तीन जण मोटारसायकलवरून उतरले
  • तोंडावर रुमाल बांधून हे तीन जण आले होते
  • त्यानंतर त्यांनी बाबा सिद्धिकी यांच्यावर तीन राऊंड फायर केले
  • बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला
  • बाबा सिद्धिकी यांना छातीत एक गोळी लागल्यानंतर ते खाली कोसळले
  • त्यानंतर लोकांनी त्यांना लीलावती रुग्णालयात तातडीने दाखल केले
  • पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी झाले दाखल
  • पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती

कोण आहेत बाबा सिद्दीकी ?

जेष्ठ नेते बाबा सिद्दीकी हे काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेते होते. त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी हे सध्या काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्याकडे पक्षाच्या मुंबई विभागाची जबाबदारी होती. 66 वर्षीय बाबा सिद्दीकी हे एकदा मंत्री तर तीन वेळा वांद्रे पश्चिमचे आमदार राहिले आहेत. सध्या त्यांचा मुलगा झीशान हा वांद्रे पूर्वचा आमदार आहे.

बाबा सिद्दीकी चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसशी संबंधित होते. मूळचे बिहारचे असलेले बाबा सिद्दिकी यांनी 1990 च्या दशकात मुंबईत निवडणुकीचे राजकारण सुरू केले. 1992 मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1997 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. बाबा सिद्दीकी 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये ते पुन्हा विजयी झाले. बाबा सिद्दीकी 2004 ते 2008 या काळात मंत्रीही होते.बाबा सिद्दीकी हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रीय होते.

बाबा सिद्दीकी यांचे बाॅलीवूडमध्ये चांगले संबंध होते. सुनिल दत्त पासून ते सलमान खान, शाहरूख खान, संजय दत्त सह आदी अभिनेत्यांच्या त्यांचे घनिष्ठ संबंध होते. बाॅलीवूडशी अत्यंत जवळचे संबंध असणारे राजकीय नेते म्हणून त्यांना देशात ओळखले जात होते.