पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं आयुष्य एका मधमाशीने (Bee therapy) बदलून टाकलं आहे, या मधमाशीने खडसेंची वेदनेतून आणि जुन्या त्रासातून मुक्ती केली आहे. खडसे हे गेल्या अनेक वर्षांपासून पाठदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास सहन करत होते. (Eknath Khadse’s life was changed by a Bee therapy)
या त्रासामुळे अनेकदा खडसे यांना आधाराशिवाय चालता येत नव्हतं. एकवेळ अशी आली होती जेव्हा त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला होता. खडसे यांनी मधमाशीच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या निसर्गोपचार पद्धतीचा आधार घेतला आणि त्यांना होणारा त्रास आता लक्षणीयरित्या कमी झाला आहे.
ऊरळी-कांचन येथील निसर्गोपचार केंद्र चालवणाऱ्या डॉ. श्रीराम कुलकर्णी (Dr ShriRam Kulkarni Uruli Kanchan) यांनी मधमाशीच्या आधारे उपचाराची पद्धत वापरायला सुरुवात केली होती. या पद्धतीचा प्रभावी उपयोग होत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी या पद्धतीचा वापर वाढवला होता.
त्यांनी आतापर्यंत 25 लाख रुग्ण बरे केले असल्याचं त्यांच्याकडून ही पद्धती शिकणाऱ्या डॉ.नांदेडकर यांनी म्हटले आहे. या उपचारपद्धतीने नागरिकांना रक्तदाब, शुगर, थायरॉईडच्या त्रासातून बरे केले असून त्यांच्या गोळ्या आयुष्यभरासाठी बंद केल्या असल्याचं डॉ.नांदेडकर यांनी म्हटले आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीने ही पद्धती कशी असते त्याचं खडसे यांच्यावरील प्रात्यक्षिक दाखवलं. अपेक फ्लोरा नावाच्या मधमाशीचा (Apache flora bee) या उपचार पद्धतीमध्ये वापर करण्यात आला होता. या मधमाशीचा दंश कंबरेच्या खाली एका विशिष्ट भागी दिला जातो.
दंश झाल्यानंतर मधमाशीचं विष हे रुग्णाच्या अंगात भिनतं. ही प्रक्रिया साधारणपणे 30 सेकंदात पूर्ण होते. हे विष संतुलित स्वरुपाचं असतं ज्याचा रुग्णाला फायदा होतो असं डॉ.नांदेडकर यांनी म्हटलं आहे. हे विष एखाद्या स्टेरॉईडप्रमाणे काम करतं आणि त्याचा कोणताही साईड इफेक्ट जाणवत नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
मधमाशी दंशाच्या उपचार पद्धतीची दुसरी थेरपी एकनाथ खडसे यांच्यावर सुरू आहे. खडसे यांनी त्यांना होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी जोधपूर, केरळच्या वाऱ्या केल्या होत्या. मुंबईमध्येही त्यांनी उपचार करुन पाहिले होते, मात्र त्यांना त्रासातून दीर्घकाळासाठी मुक्ती मिळत नव्हती.
मधमाशी पद्धतीने निसर्गोपचार केल्याने आपल्याला 70 ते 80 टक्के फायदा झाला असून आपलं दुखणं बंद झाल्याचं खडसे यांनी म्हटलंय. आपण आता कोणाच्याही आधाराशिवाय चालू शकतो, वेगात चालू शकतो आणि लहान पायऱ्या कोणाच्याही आधाराशिवाय चढू शकतो असं खडसे यांनी म्हटलं आहे.