Beed news | पाटोद्यातील पारधी वस्तीवर संतप्त जमावाचा धुडगूस, घरे पेटवली, जमावाच्या हल्ल्यात चिमुकला ठार
जखमींवर बीडमध्ये उपचार सुरु, एकाची प्रकृती चिंताजनक
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : beed news | बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे संतप्त जमावाने पारधी वस्तीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.तर सात ते आठ जण जखमी झाले आहेत.यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे.या घटनेत जमावाकडून पारध्यांची घरे जाळण्यात आली आहेत. या घटनेतील जखमींवर बीडमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणामुळे बीड जिल्हा हादरून गेला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाटोदा तालुक्यातील पारनेर या गावात पारधी समाजाची वस्ती आहे.वस्तीवरील पारध्यांच्या नित्यनेमाने होणाऱ्या कटकटीला व वादावादीला ग्रामस्थ पुरते वैतागून गेले होते.याचाच उद्रेक शनिवारी झाला. शनिवार रात्री 11 ते 12 च्या सुमारास आक्रमक झालेल्या जमावाने पारधी वस्तीवर जोरदार हल्ला चढवला. तसेच अनेक घरे पेटवून देण्यात आली. यात संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. दरम्यान ही घटना चोरीच्या आरोपातून झाल्याचे बोलले जात आहे.
जमावाच्या मारहाणीत सिध्दांत अरुण काळे वय वर्षे दोन या बालकाचा मृत्यू झाला आहे. तर भिवराबाई अभिमान काळे (वय 65 वर्षे) अभिमान काळे (वय 70 वर्षे) सगुना अरुण काळे, ताराबाई पुर्ण नाव नाही ,विद्या साईनाथ भोसले हे जखमी झाले आहेत. जखमींपैकी अभिमान काळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान या घटनेप्रकरणी भिवराबाई अभिमान काळे (65 रा.पारनेर) यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी मध्यरात्री अकरा ते बाराच्या दरम्यान गावातील बबन औटे, बाळू औटे, कचरू औटे व त्यांची तीन मुले, विनोद औटे, अशोक दहीवळे, विष्णू औटे, युवराज औटे व इतर 10 ते 12 जणांनी आमच्या घरात येवून तुझा पोरगा अरूण याने आमच्या माणसाला चाकू मारला असे म्हणत काठी व लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्याचप्रमाणे जातीवाचक शिवीगाळ करून धमक्या दिल्या तसेच पत्र्याचे शेड जाळून टाकले.या मारहाणीत भिवराबाई यांचा दोन वर्षाचा नातू मानू उर्फ सिद्धांत अरूण काळे याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर आठ ते दहा जण जखमी झाले.
दरम्यान गुन्हे दाखल होताच पाटोदा पोलिसांनी सात आरोपींची धरपकड केली आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आले आहेत. डीवायएसपी विजय लगारे हे रविवारी दिवसभर पाटोद्यात तळ ठोकून होते. पारनेरमध्ये परिस्थिती बिघडू नये यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पारनेरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे.
दरम्यान पारनेरमध्ये जमावाने पारध्यांची घरे जाळून पारध्यांना बेदम मारहाण केली आहे. यात एका बालकाचा मृत्यू झाल्याची खबर पाटोदा पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक मनिष पाटील यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली होती.या पथकात एपीआय धरणीधर कोळेकर, पीएसआय पठाण, पोलीस नाईक सुनिल सोनवणे ,शिपाई तांबे पोलीस नाईक गुरसाळे ,पोलीस कर्मचारी बाळु सानप , बळीराम काथखडे ,कनके ,डोके सह आदींचा समावेश होता. पोलिसांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विजय लगारे यांनीही घटनास्थळी भेट दिली व वेगाने तपास हाती घेतला.
web title: beed news In Parner, angry mobs attack Pardhi settlement, set houses on fire, two-year-old boy killed in mob attack