बहुचर्चित जलयुक्त शिवार योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेली जलयुक्त शिवार योजना (Jalyukta Shivar Yojana) महाविकास आघाडी सरकारने बंद केली होती. तसेच या योजनेची चौकशी सुरु केली होती. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर जलयुक्त शिवार योजनेची पुन्हा चर्चा सुरु होती. परंंतू आता याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठी घोषणा केली आहे.

Big announcement of Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Jalyukta Shivar Yojana

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्याची घोषणा फडणवीस यांनी आज केली.या योजनेची व्याप्ती वाढवली जाणार आहे. त्यात गावे जलस्वयंपूर्ण बनविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात ३९ लाख हेक्टरवरील शेती सिंचनाखाली आली असून, सुमारे २७ टीएमसी पाणीसाठा तयार झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.

पुण्यात कृषी विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय ‘नैसर्गिक शेती’वरील एकदिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले, ‘रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला असून, ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात २०२५ पर्यंत राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली जाईल.

२०१६-१७ मध्ये नैसर्गिक शेतीचे अभियान सुरू केल्यानंतर ९.५ लाख हेक्टर शेती नैसर्गिक पद्धतीने होत आहे. दुसऱ्या टप्प्यात हे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी व फलोत्पादन विभागाने आखलेल्या कार्यक्रमाला आवश्यक निधी देण्यात येईल. यामुळे शेतकरी सुजलाम-सुफलाम होईल.’ असेही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यावेळी बोलताना म्हणाले की, ‘शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळविण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रयत्न करण्यात येतील. नैसर्गिक शेतीच्या साहाय्याने भरड धान्याचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. विषमुक्त शेतीविषयीचे सरकार लवकरच धोरण ठरवेल.’