बिग ब्रेकिंग : राज्यातील नगरपरिषद निवडणूका लांबणीवर, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतीच्या निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत, यामध्ये जामखेड परिषदेचाही समावेश आहे. निवडणूक आयोगाकडून आज यासंबंधी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांना स्थगिती देण्याचा मोठा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे इच्छुकांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये अशी मागणी सर्व राजकीय पक्ष आणि OBC नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यातच ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टातील याचिकेचा निकालही प्रलंबित आहे. जोवर निकाल येत नाही तोवर निवडणूका घेऊ नयेत अशी मागणी होत होती.या मागणीला निवडणुक आयोगाने प्रतिसाद देत निवडणुकांना स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेची 12 जुलै रोजी सुनावणी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागासप्रवर्गाबाबत (OBC) दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी दि.19 जुलै रोजी ठेवलेली आहे. या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022 रोजी जाहीर केलेला राज्यातील निवडणूक कार्यक्रम स्थगित केला आहे. सदर निवडणूकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे आयोगाने आज जारी केलेल्या स्थगिती आदेशात म्हटले आहे.

निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे वरील सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिता आता लागू राहणार नाही, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

निवडणुका रद्द झालेल्या नगरपरिषदांची जिल्हा व वर्गनिहाय नावे:

अ वर्ग

  1. जळगाव- भुसावळ.
  2. पुणे- बारामती.
  3. सोलापूर- बार्शी
  4. जालना- जालना. बीड- बीड
  5. उस्मानाबाद- उस्मानाबाद.

‘ब’ वर्ग

  • नाशिक- मनमाड, सिन्नर व येवला.
  • धुळे- दोंडाईचा वरवाडे व शिरपूर वरवाडे.
  • नंदुरबार- शहादा. जळगाव- अमळनेर व चाळीसगाव.
  • अहमदनगर- कोपरगाव, संगमनेर व श्रीरामपूर
  • पुणे- चाकण व दौंड
  • सातारा- कराड व फलटण
  • सांगली- इस्लामपूर व विटा
  • सोलापूर- अक्कलकोट, पंढरपूर व अकलूज.
  • कोल्हापूर- जयसिंगपूर. औरंगाबाद- कन्नड व पैठण
  • बीड- अंबेजोगाई, माजलगाव व परळी- वैजनाथ
  • लातूर- अहमदपूर. अमरावती- अंजनगाव

‘क’ वर्ग

  1. नाशिक- चांदवड, नांदगाव, सटाणा व भगूर
  2. जळगाव- वरणगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा व यावल
  3. अहमदनगर- जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता व राहुरी
  4. पुणे- राजगुरूनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड व शिरूर
  5. सातारा- म्हसवड, रहिमतपूर व वाई. सांगली- आष्टा, तासगांव व पलूस
  6. सोलापूर- मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा व सांगोला
  7. कोल्हापूर- गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड व वडगांव
  8. औरंगाबाद- गंगापूर व खुलताबाद
  9. जालना- अंबड, भोकरदन व परतूर
  10. बीड- गेवराई व किल्ले धारूर
  11. उस्मानाबाद- भूम, कळंब, मुरूम, नळदुर्ग, उमरगा, परांडा व तुळजापूर
  12. लातूर- निलंगा व औसा. अमरावती- दर्यापूर
  13. बुलढाणा- देऊळगावराजा.

नगरपंचायती

  • अहमदनगर- नेवासा.
  • पुणे- मंचर व माळेगाव बुद्रुक.
  • सोलापूर- अनगर.