जामखेड टाइम्स वृत्तसेवा | अगामी काळात होऊ घातलेल्या राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी येत्या 13 जूलै रोजी आरक्षण सोडत जाहीर होणार होती मात्र आता आरक्षण सोडती संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 13 रोजी होणारी आरक्षण सोडतीला स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जारी केले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या 5 जूलै 2022 च्या पत्रान्वये राज्यातील 25 जिल्हा परिषदा व 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका – 2022 करिता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देण्यात आला होता परंतु सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका क्र. 19756/2021 मध्ये राज्य शासनाने दाखल केलेल्या अर्जावर आज झालेल्या सुनावणीत अगामी निवडणुकांसाठी कुठलीही प्रक्रिया हाती घेण्यात येऊ नयेत असे निर्देश दिले होते. तसेच एका आठवडयानंतर पुढील सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
सुप्रीम कोर्टात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं काय झालं ? कोर्टाने काय दिले आदेश ? जाणून घ्या सविस्तर
त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम रद्द केला आहे. तसे आदेश आज जारी करण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या आदेशात म्हटले आहे की, आयोगाच्या 5 जूलै 2022 रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात येत आहे. यासंदर्भात सुधारीत आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात होणाऱ्या सुनावणीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर काय निर्णय होतो त्यानंतरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठीच्या आरक्षण सोडतीची तारीख जाहीर होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राज्यातील ओबीसी नेत्यांचे लक्ष लागले आहे.