Hidden Viruses | जागतिक तापमानवाढीमुळे (global warming) भविष्यात हिमनद्या (Glaciers) वितळल्याने लाखो टन जिवाणू आणि विषाणू या हिमनद्यांतून बाहेर पडतील, असे युरोपियन शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, हवामानाच्या संकटामुळे बर्फ जलद वितळून (Snow melts fast) अनेक जिवाणू आणि विषाणू (Bacteria, viruses) एकतर नाहीसे होत आहेत किंवा ते बर्फातून समुद्राकडे (sea) वाटचाल करत आहेत. यामुळे कोरोनापेक्षाही महाभयंकर महामारीच्या (Epidemic) विळख्यात जग अडकण्याची भीती आहे. याबाबत लंडन येथे विज्ञान संशोधक असलेले डॉ. नानासाहेब थोरात (Dr. Nanasaheb Thorat) यांचा सामनामध्ये एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात नेमकं काय म्हटले आहे ? जाणून घेऊयात.
साधारणपणे दहा वर्षांपूर्वी फ्रान्समधील एक शास्त्रज्ञांची टीम अतिथंड वातावरणाचा जीवजंतूंवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी जगभर फिरत होती. युरोपमधील अनेक अतिथंड प्रदेशांतून त्यांनी प्रवास करून ते रशियातील सायबेरियन भागामध्ये आले होते. सायबेरिया हा भाग जगातील अतिथंड भागात गणला जातो आणि जवळपास 95 टक्के प्रदेशात अजूनही मनुष्य पोहोचू शकला नाही. या भागात त्या शास्त्रज्ञांनी जमिनीवरील बर्फाच्या थराचे आणि जमिनीपासून सुमारे 100 फूट खाली जिथेपर्यंत बर्फ आहे अशा ठिकाणचे काही नमुने घेतले व त्याच्यावरती वैज्ञानिक प्रयोग सुरू केले.
जमिनीपासून 100 फूट खालील जे नमुने घेतले होते त्यामध्ये त्यांना काही जिवाणू आणि विषाणू सापडले. ते जीवजंतू निष्क्रिय अवस्थेत होते, पण त्यांनी जेव्हा प्रयोगशाळेत योग्य ते वातावरण निर्माण केले तेव्हा असे दिसून आले की, ते जिवाणू आणि विषाणू सक्रिय होऊ शकतात. त्यामधील काही जिवाणू आणि विषाणू फक्त सक्रियच नाही तर संसर्गजन्यसुद्धा आहेत. म्हणजेच हे जिवाणू किंवा विषाणू एखाद्या मनुष्याच्या शरीरात गेले तर त्यांच्यापासून एखादा नवीनच संसर्गजन्य रोग होऊ शकतो आणि त्यावरती उपचार मात्र लवकर शोधला जाऊ शकणारा नाही.
यामधील काही विषाणू 30 हजार वर्षांपासून त्या बर्फाखाली निपचित होते आणि त्यांच्यामुळे गेल्या हजारो वर्षांमध्ये मानवाला कोणताही धोका झाला नव्हता. त्याच वेळी या शास्त्रज्ञांनी जगाला इशारा दिला होता की, निसर्गात ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप झाला नाही अशा ठिकाणी हस्तक्षेप करू नका, अन्यथा जग पुन्हा एखाद्या महामारीमध्ये अडकून पडेल.
शास्त्रज्ञांनी दिलेली धोक्याची सूचना आता खरी होताना दिसून येत आहे. अद्यापही या धोक्याबाबतचे गांभीर्य जगभरात दिसून येत नाहीये, पण येणाऱया भविष्यात आपल्याला याचे दूरगामी परिणाम दिसून येतील. अगदी अलीकडे चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटच्या परिसरात काही नवीनच विषाणू आणि जिवाणू सापडले आहेत. चीनने आपला महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प तिबेटच्या अनेक भागांत विस्तारित केला आहे. तिबेट हासुद्धा लाखो वर्षांपासून मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिलेला प्रदेश आहे. लाखो वर्षांपासून बर्फ त्या ठिकाणी साचून राहिलेला आहे. या बर्फाखालीसुद्धा हजारो प्रकारचे जिवाणू आणि विषाणू निपचित अवस्थेत अजूनही आहेत.
जानेवारी 2020 मध्ये यावरील काही वैज्ञानिक अहवाल प्रकाशित झाले. या अहवालांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार तिबेटच्या ज्या भागांमध्ये सध्या मानवी हस्तक्षेप जोरात सुरू आहे अशा प्रदेशांत 28 प्रकारचे विषाणू सापडले आहेत आणि हे विषाणू कमीत कमी 15 हजार वर्षांपासून बर्फाखाली निपचित पडलेले आहेत. अशाच प्रकारचे प्रयोग तिबेटमध्ये 1992 आणि 2015 मध्ये केले होते, पण त्यावेळी आधुनिक तंत्रज्ञान नसल्यामुळे नक्की ते जीवजंतू बर्फाखालील आहेत की जमिनीवरील आहेत, हे समजणे अवघड होते. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे विषाणू कधीचे आहेत किंवा ते नक्की संसर्गजन्य आहेत का नाहीत हे समजणे अतिशय सोपे झाले आहे आणि त्यामुळेच ही नवीन माहिती जगासमोर आली आहे.
फक्त चीनचाच नाही तर भारतीय उपखंडाच्या विचार केला तर भारताच्या हद्दीत असणाऱया हिमालयातसुद्धा हजारो प्रकारचे विषाणू आणि जिवाणू यांचा अधिवास लाखो वर्षांपासून आहे. अगदी अलीकडेच भारतातील प्रथितयश अशी विज्ञान संशोधन संस्था इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स आणि निगाता युनिव्हर्सिटी जपान यांनी संयुक्तरीत्या केलेल्या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांना सुमारे 600 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या प्राचीन महासागरातून सोडलेल्या खनिज साठय़ांमध्ये अडकलेल्या पाण्याचे थेंब सापडले आहेत. हिमालयात उंचावर पॅल्शियम आणि मॅग्नेशियम कार्बोनेट दोन्ही असलेल्या ठेवींचे विश्लेषण केल्यामुळे पृथ्वीच्या इतिहासातील ऑक्सिजनची माहिती आता शास्त्रज्ञांना मिळू शकेल व या माहितीवरून हिमालयात वेगळे काही अजूनपर्यंत मानवाला माहीत नसलेले जिवाणू किंवा विषाणू यांचा सुगावा घेता येऊ शकतो.
मार्च 2020 पासून एका विषाणूमुळे आलेला कोरोना आजार हा एका लहान तीव्र भूकंपाप्रमाणे आहे, तर ऑण्टिबायोटिक्सच्या प्रतिरोधकांच्यामुळे येणारा भविष्यातील संसर्गजन्य रोग ही प्रचंड त्सुनामी असेल. लाखो रुग्णांवर जेव्हा एखादी शस्त्रक्रिया केली जाते तेव्हा डॉक्टरांना सर्वात मोठी भीती ही जिवाणूमुळे होणाऱया संसर्गाची असते आणि असा संसर्ग होऊ नये म्हणून त्या रुग्णाला ऑण्टिबायोटिक्स घ्यावी लागतात. नजीकच्या भविष्यात जेव्हा ही ऑण्टिबायोटिक्स निरुपयोगी होतील तेव्हा शस्त्रक्रिया झाल्यानंतर जो संसर्ग होतो तो आपण रोखू शकणार नाही आणि वेगवेगळय़ा आजारांवर शस्त्रक्रिया होणाऱया लाखो रुग्णांसाठी ते प्राणघातक असेल. यामध्ये सर्वाधिक मृत्यू कॅन्सर आणि मधुमेहसारखे आजार होणाऱया रुग्णांचे असतील.
हा प्रश्न अजून जटिल होऊ नये म्हणून हिमालयीन देशांनी म्हणजेच भारत, चीन, नेपाळ, भूतान आणि पाकिस्तान या देशांनी हिमालयातील ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप झाला नाही अशा ठिकाणी अधिक खबरदारी आणि नियमावली केली पाहिजे. कारण हिमालयामध्येसुद्धा हजारो प्रकारचे जिवाणू आणि विषाणू तसेच अनेक प्रकारच्या बुरशी लाखो वर्षांपासून बर्फाखाली निर्जीव अवस्थेत आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे त्यांचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धोका रोखायचा असेल तर या देशांमध्ये अशा प्रकारची वैज्ञानिक जनजागृती करायला हवी. राजकीय आणि प्रशासकीय लोकांना याची गंभीरता पटवून दिली पाहिजे. जगातील सर्वच देशांनी घनदाट जंगलातील, पर्वतातील, नदीतील, बर्फातील आणि वाळवंटातील मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, तरच आपण भूतकाळापासून होणारा भविष्यातील धोका टाळू शकतो.
( सूचना : सदरचा लेख दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध झालेला आहे.)