राज्यातील दुकानांच्या पाट्यांबाबत राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ! वाचा सविस्तर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत दुकानांवरील पाट्यांसंदर्भात सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीतच असाव्यात अशी मागणी सातत्याने होत होती. मराठी वाचवा अशी मोहिम राज्यात राबवली जात होती. विशेषत: महानगरांमध्ये हा मुद्दा अधिक तापलेला असायचा परंतू दुकानांवर वेगवेगळ्या भाषांमधील पाट्या लावलेल्या असल्याने सरकारने राज्यातील सर्व दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात असा नियम केला होता परंतू त्याची अंमलबजावणी होत नव्हती, अनेक पळवाटा शोधल्या जायच्या. अनेक पाट्यांवर इंग्रजी मजकुर मोठा आणि मराठी छोटा असायचा.

दरम्यान बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत हा मुद्दा चर्चेला आल्यानंतर मंत्रिमंडळाने मराठी पाट्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार इतर भाषेप्रमाणे मराठीतील नाव तेवढेच मोठे ठेवावे लागणार आहे. मराठीत देवनागरी लिपीतील अक्षरे दुसर्‍या ( इंग्रजी किंवा अन्य ) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत अशी महत्वाची दुरूस्ती मंत्रिमंडळाने आज बैठकीत केली आहे.

दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017’ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याचीही मागणीही होत होती. आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकांनावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यांलगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील.