Krishna Marathwada Irrigation Project | आष्टीकरांना शिंदे -फडणवीस सरकारकडून मोठे गिफ्ट, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी ११ हजार ७३६ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Krishna Marathwada Irrigation Project । कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देण्यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील आष्टीकरांना दिवाळीपुर्वीच सरकारकडून मोठे गिफ्ट मिळाले आहे.आष्टीकरांना लवकरच मोेठे गिफ्ट देणार असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. अखेर फडणवीसांनी हा शब्द पाळला आहे.
आष्टी – अहमदनगर रेल्वे लोकार्पण सोहळ्यात आमदार सुरेश धस यांनी कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा फायदा आष्टी तालुक्यापर्यंत होणार आहे. या प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती.
या मागणीवर बोलताना धस साहेब काळजी करू नका, आपलं सरकार आलयं, आता द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये मौजे शिंपोरा ते खुंटेफळ थेट पाईपलाईन या कामाचा समावेश केला जाईल, या प्रकल्पाला कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही, अशी घोषणा केली होती.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यमंत्रीमंडळाची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना संजीवनी देणाऱ्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देण्यासाठी ११ हजार ७३६ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने आष्टीकरांना मोठे गिफ्ट मिळाले आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामुळे मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील १३३ गावांतील १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळ, औरंगाबाद अंतर्गत उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्याच्या भागात प्रस्तावित असून प्रथम टप्प्यात ७ अघफू व दुसऱ्या टप्प्यात १६.६६ अघफू असे एकूण २३.६६ अघफू पाणी वापर आहे.
या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, लोहारा व उमरगा तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला लाभ होणार आहे.