जामखेड टाइम्स वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे विरूद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा संघर्ष शिगेला पोहचला आहे. शिवसेना फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांची जामिनावर सुटका होताच राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. ठाकरे गटाला शिंदे गटाकडून मोठा धक्का देण्यात आला आहे. ठाकरे गटातील ‘तेरावा’ खासदार शिंदे गटाच्या गळाला लागला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी अशी ओळख असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांंनी शिंदे गटात प्रवेश करत उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेची पडझड सुरूच असल्याचे यावरून पुन्हा अधोरेखित झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे गजानन किर्तिकर यांनी प्रवेश केला, यानंतर आता शिंदे गटातील खासदारांची संख्या आता १३ वर गेली आहे. यामुळे ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला आहे.
यापूर्वी देखील किर्तिकर हे शिंदे गटात जाऊ शकतात असे बोलले जात होते. दरम्यान किर्तिकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. काही वेळापूर्वी किर्तिकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी बैठक झाली होती. त्यानंतर काही वेळातच त्यांचा शिंदे गटात प्रवेश झाला आहे.
शिवसेनेचे जेष्ठ नेते किर्तिकर हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत, तसेच १९९० ते २००९ काळात ते चार वेळा आमदार देखील राहीले आहेत. युतीसरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. तसेत सलग दोन वेळा लोकसभा खासदार म्हणून त्यांची निवड झाली होती.