मोठी बातमी : अखेेर भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल, हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरण भोवले !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । हिंदू देवस्थान जमीन घोटाळ्याप्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस चांगलेच अडचणीत सापडले आहेत. आमदार सुरेश धस आणि त्यांच्या कुटुंबातील दोघा सदस्यांसह आणखी दोघा अश्या पाच जणांविरोधात आष्टी पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Big news, case filed against BJP MLA Suresh Dhas in Hindu Devasthan land scam case, Suresh Dhas latest news)
आष्टी तालुक्यातील हिंदू देवस्थान असलेल्या विठोबा देवस्थान, मुर्शदपूर, विठोबा देवस्थान, पांढरी, विठोबा देवस्थान, खडकत, खंडोबा देवस्थान, बेलगाव, श्रीरामचंद्र देवस्थान, आष्टी, श्रीरामचंद्र देवस्थान, चिखली, श्रीरामचंद्र देवस्थान, चिंचपूर व पिंपळेश्वर देवस्थान, आष्टी या देवस्थानांच्या कथित जमीन घोटाळा उघडकीस आला होता.
या बहुचर्चित हिंदू देवस्थान जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. भाजपचे मराठवाड्यातील वजनदार नेते आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी प्राजक्ता, बंधू देविदास, मनोज रत्नपारखी , अस्लम नवाब खान यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८, बनावट कागदपत्रे तयार करून कट रचून फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
आष्टी तालुक्यातील हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी गेल्या काही महिन्यांपासून मोठा लढा उभारला होता. अखेर या लढ्याला यश आले आहे. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने 18 ऑक्टोबर रोजी सदर प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या याचिकेला आमदार सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयात अव्हान दिले होते, परंतू सर्वोच्च न्यायालयाने धस यांना दिलासा दिला नाही. हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे आमदार सुरेश धस यांच्यावर कोणत्याही क्षणी गुन्हा दाखल होण्याची स्थिती निर्माण झाली होती.
13 जानेवारी 2022 रोजी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी दाखल केलेली तक्रार एफआयआर समजून गुन्हे नोंदविण्याचे आदेश औरंगाबाद हायकोर्टाने दिले होते. त्यानुसार 29 नोव्हेंबर 2022 रोजी आष्टी पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम १३(१)(अ) (ब),१३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८सह कलम- ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब)१०९ भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे करत आहेत.
महाविकास आघाडी सरकार असताना आमदार सुरेश धस यांच्यावर देवस्थानच्या जमीनी बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप झाले होते. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही आरोप केले होते. स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील धस यांच्यावर आरोप केले होते. याबाबत त्यांच्याविरूद्ध तक्रार दिली होती. मात्र आरोपकर्त्यांचा दावा होता की, तक्रार करूनही कारवाई होत नाही. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आता लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या तक्ररीमुळे पोलिसात गुन्हा नोंदवला गेला आहे. धस यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने बीडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.