जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन दीड महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. रोज तारिख पे तारीख सुरु आहे. यामुळे शिंदे सरकारवर विरोधकांकडून रोज टीकेची झोड उठवली जात आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिका दाखल असल्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचे बोलले जात आहे. अश्यातच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट आता समोर आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार असल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिले आहे. यामुळे मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार यावर पडदा पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मंत्रीमंडळात समावेश व्हावा यासाठी इच्छुक नेत्यांनी मंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी लाॅबिंग सुरु केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार दोन टप्प्यांत होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याचीच राज्याला उत्सुकता लागली आहे. शिंदे गट आणि भाजप कडून स्वच्छ प्रतिमेचे चेहरे मंत्रिमंडळात दिले जाणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाकडून पहिल्या टप्प्यात सहा जणांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून 10 ते 12 जणांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे दिसत आहे. विधिमंडळ सचिवालयातील धावपळ याचेच संकेत देत आहे.
शिंदे गटाकडून कोणाची वर्णी ?
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात शिंदे गटातील दादा भूसे, उदय सामंत, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संदिपान भूमरे, शंभूराज देसाई यांचा समावेश केला जाऊ शकतो.
भाजपकडून कोणाची वर्णी ?
चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राम शिंदे, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, डाॅ संजय कुटे, रवि राणा, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील सह आदींना शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.
खातेवाटपाचा तिढा की सहमती
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला असला तरी, खातेवाटपात भाजपकडे वजनदारी खाती जाणार असल्याची चर्चा आहे. यातून दोन्ही गटात तिढा निर्माण होऊ नये याकरिता शिंदे – फडणवीस दिल्लीच्या वाऱ्या करताना दिसत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरु आहे.