मोठी बातमी : इतर मागास प्रवर्गातील चार समुदायांसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला महामंडळ निर्मितीचा निर्णय, प्रत्येक महामंडळासाठी केली 50 कोटींची तरतूद!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारने इतर मागास प्रवर्गातील चार समुदायांसाठी महामंडळ निर्मिती करण्याची मोठी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील वडार, रामोशी, गुरव व वीरशैव लिंगायत या चार समाजाला मोठा फायदा होणार आहे. महामंडळ निर्मितीचा शासन निर्णय राज्य सरकारने बुधवारी जारी केला आहे. प्रत्येक महामंडळासाठी सरकारने 50 कोटींची तरतूद केली आहे.
मार्च महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर मागास प्रवर्गातील वडार, रामोशी, गुरव व वीरशैव लिंगायत या चार समुदायांसाठी महामंडळ स्थापन करण्याबाबतची घोषण केली होती. या घोषणेची सरकारने बुधवारी अंमलबजावणी केली. यामुळे आता वडार, रामोशी, गुरव व वीरशैव लिंगायत या चार समुदायांचे स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे चारही समुदायांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वीरशैव लिंगायत, वडार, रामोशी आणि गुरव समाजासाठी स्वतंत्र महामंडळांची निर्मिती करण्यात आली आहे. रामोशी, वीरशैव लिंगायत, वडार, गुरव समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र उपकंपन्यांची स्थापना करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. चारही समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळाची रचनादेखील जाहीर करण्यात आली आहे.
बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना आदी योजनांचा फायदा मिळणार आहे. समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामुग्री, व्यवस्थापकीय साधने पुरवणे, कृषी उत्पादने, वस्तू, साहित्य आदी आवश्यक गोष्टींचा पुरवठा करणे. समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे. योजनासाठी अहवाल तयार करणे. संबंधित महामंडळाच्या धर्तीवर शासनाने मंजूरी दिलेल्या योजना राबवणे आदि जबाबदाऱ्या संबंधित महामंडळांना पार पाडाव्या लागणार आहेत. महामंडळाच्यावतीने देण्यात आलेली कर्जेही वसूल करण्याकडे महामंडळांना लक्ष द्यावे लागणार आहे.
कोणत्या समाजासाठी कोणते महामंडळ?
वीरशैव-लिंगायत समाजासाठी ‘जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन.
वडार समाजासाठी ‘पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन.
गुरव समाजासाठी ‘संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन.
रामोशी समाजासाठी ‘राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन
निधी आणि पदनिर्मिती मंजूर
चारही महामंडळ सुरु करण्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. महामंडळ तात्काळ सुरु करण्यासाठी शासनाकडून पद निर्मितीलाही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.