मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांच्या अंदोलनाची होणार SIT चौकशी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश
Manoj jarange SIT Enquiry News : मनोज जरांगे पाटील यांनी हाती घेतलेल्या मराठा आरक्षण अंदोलनाला मंगळवारी वेगळे वळण लागले. मनोज जरांगे पाटील यांच्या अंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचे तीव्र पडसाद मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
“मनोज जरांगे पाटील यांच्याशी माझे देणेघेणे नाही. त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे शोधलं जाईल. संभाजीनगर, पुणे आणि नवी मुंबईत वॉर रूम कोणी सुरू केली, यासह संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत कालबद्धरीतीने सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना दिली.
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या हिंसक वक्तव्यांविषयी हरकत नोंदवली. महाराष्ट्र बेचिराख करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निपटून टाकू, अशी भाषा केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनाही म्हणाले तुम्हाला शेवटची संधी देतो, पंतप्रधान मोदी यांची सभा होऊ देणार नाही, अशी धमकी दिली जाते, हे काय चालले आहे? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना धमक्या देण्याइतपत त्यांना बळ कोणी दिले? हा कटकारस्थानाचा भाग आहे. त्यामुळे याची एसआयटीमार्फत कालबद्धरीतीने चौकशी व्हावी, अशी मागणी शेलार यांनी केली. त्यावर, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता एसआयटी चौकशीचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र म्हणाले, विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार या प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत कालबद्ध चौकशी केली जाईल. ते पुढे म्हणाले, “मला याविषयी बोलायचे नव्हते. मराठा सामाजा संदर्भात मी काय केले, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यासाठी कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले, ते उच्च न्यायालयात टिकले. जरांगे पाटील माझ्याविषयी बोलले, त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला”, असेही त्यांनी नमूद केले.
“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि दुसऱ्यांना शिव्या द्यायच्या. मनोज जरांगेना आणणारे कोण आहेत, कोणाच्या कारखान्यावर बैठक झाली, कोणी दगड पुरवले, दगडफेक कोणी करायला सांगितली, हे आता आरोपी कबूल करू लागले आहेत. पोलिसांवर दगडफेक करायला कोणी सांगितले, हेही आरोपींनी जबाबात सांगितले. दगडफेक झेलणारे पोलीस आपले नाहीत का? याआधीचे मराठा मोर्चे शांततेने झाले होते, पण हे शांततेने झालेले नाही. त्यांचे (जरांगे) कोणासोबतचे त्यांचे फोटो बाहेर येऊ लागले आहेत, कोणाचे कार्यकर्ते म्हणवत आहेत, कुठून पैसे येत आहेत, हे सगळे बाहेर येत आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.