मोठी बातमी : शिंदे गटाच्या मराठवाड्यातील आमदाराला हृदयविकाराचा झटका, आमदार संजय शिरसाट यांना विशेष एअर एम्ब्युलन्सने मुंबईला हलवले
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट ( MLA Sanjay Shirsat ) यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना तातडीने विशेष एअर एम्ब्युलन्सने मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलविण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये सोमवारी शिरसाट यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र मंगळवारी सकाळी तातडीने त्यांना उपचारासाठी मुंबईत आणण्यात आलं आहे.
मुंबई विमानतळावर आज सकाळी आमदार संजय शिरसाठ एअर ऍब्युलन्सनने दाखल झाले. त्यांना विमानतळावरील रुग्णवाहिकेतून बाहेर आणण्यात आलं. त्यानंतर एका खासगी कार्डियाक रुग्णवाहिकेतून त्यांना वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मुंबई विमानतळावरील रुग्णवाहिकेतून कार्डियाक एब्युलन्समध्ये संजय शिरसाट हे स्वतः चालत गेले. सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या हाताला धरुन चालत जात शिरसाट हे स्वतः कार्डियाक रुग्णावाहिकेमध्ये चढताना दिसले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे जाणवत होता. तसंच काहीसा अशक्तपणाही संजय शिरसाट यांना आल्याचं समोर आलेल्या दृश्यांमध्ये दिसलं.
आमदार संजय शिरसाट यांना सोमवारी दुपारी औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अस्वस्थ वाटू लागल्यानं तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्यात आलं आहे. मुंबईच्या लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार केले जातील.
संजय शिरसाट यांच्यासोबत त्याचा परिवार, निकटवर्तीय आणि काही कार्यकर्ते असल्याचंही पाहायला मिळालं. आज सकाळी एअर एम्ब्युलन्समधून तातडीन संजय शिरसाट यांना औरंगाबाद विमानतळावरुन मुंबईला हलवण्यात आलं होतं. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्यात आलं.
डॉक्टरांनी काय म्हटलं?
काल दुपारी 4.30 वाजता शिरसाट यांचा बीपी वाढला होता. संजय शिरसाट यांना श्वास घेण्यातही काहीशा अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सर्व तपासण्याकरुन त्यांना बीपी आणि हृदयासाठीची औषधं देण्यात आली, असं डॉक्टरांनी सांगितलं.
श्वासाचा आणि बीपीचा त्रास कमी झाल्याचं कळल्यानंतर त्यांना मुंबईला शिफ्ट करण्यात आलंय. संजय शिरसाट यांची एजिओप्लास्टीही आधीच झालेली आहे. दोन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होतं. मात्र सकाळी जाताना त्यांची प्रकृती स्थिर होती, अशी माहिती सिग्मा रुग्णालयाचे डॉक्टर टाकळकर यांनी दिली.