मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप, रामदास आठवलेंचा ऐकेकाळचा ‘खास’ माणूस उध्दव ठाकरेंच्या गटात
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । शिवसेनेला एकिकडे गळती लागलेली असतानाच इनकमिंग ही जोरात होऊ लागली आहे. माजी आमदार अवधूत तटकरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही तास उलटत नाही तोच उध्दव ठाकरे गटाच्या गळाला मोठा मासा लागला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या ऐकेकाळच्या ‘खास’ माणसाने शिवसेनेत प्रवेश केला आहे.हा प्रवेश आठवले यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आठवले गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष सचिव असलेले आंबेडकरवादी आणि बहुुजन चळवळीचे जेष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी आठवले यांच्या पक्षाला राम राम ठोकत आज 14 रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. गायकवाड यांच्यासह त्यांच्या असंख्य समर्थकांनीही हाती शिवबंधन बांधले.
ऐकेकाळी अशोक गायकवाड हे रामदास आठवले यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. अहमदनगर जिल्ह्यातील पक्षसंघटना वाढीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व म्हणून गायकवाड ओळखले जातात. अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.
जेष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या शिवसेना प्रवेशामुळे अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. गायकवाड यांच्या माध्यमांतून वंचित उपेक्षितांची वोट बँक शिवसेनेच्या पाठीशी एकवटली जाणार आहे.
दरम्यान शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडाळीनंतर सेनेचे विभाजन झाले. शिंदे आणि ठाकरे या गटामध्ये शिवसेना कोणाची यावरून संघर्ष पेटलेला आहे. एकिकडे सेनेत पडलेल्या फुटीनंतर अनेक नवे चेहरे सेनेत दाखल होत आहेत. ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवला जात आहे. त्यामुळे अगामी काळात ठाकरे फॅक्टर राज्यात निर्णायक ठरू शकतो अशी चर्चा रंगू लागली आहे.