जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच न सुटल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते, परंतू आता इच्छुक उमेदवारांचा हिरमोड करणारी एक बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारने प्रशासकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय आज घेतला आहे. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत.
राज्यातील 18 महानगरपालिका, 164 नगरपालिका, 25 जिल्हा परिषद, 284 पंचायत समित्यांची मुदत काही महिन्यांपूर्वी संपलेली आहे. यावर सध्या प्रशासक राज सुरू आहे. येत्या 15 सप्टेंबरला प्रशासकराजला सहा महिने पुर्ण होतील. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर २०२२ पूर्वी पार पडणार नसल्यामुळे प्रशासकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांच्या प्रशासक नियुक्तीचा कार्यकाळ सप्टेंबर २०२२ मध्ये संपत आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाची प्रक्रीया आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लक्षात घेता, या निवडणुका सप्टेंबर पूर्वी पार पडणार नसल्यामुळे प्रशासकांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तसा निर्णय मंत्रिमंडळ बैठकी आज घेण्यात आला.