मोठी बातमी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लवकरच, एकनाथ शिंदे सरकार जाणार की राहणार?, ठाकरेंना धक्का की शिंदेंना दिलासा? उत्सुकता शिगेला !
मुंबई । ८ जानेवारी २०२४ : शिवसेना पक्ष फूटल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. पक्षाविरोधात जाऊन भाजपाबरोबर गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवावं, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांवर सोपवला होता. त्यावरील सुनावणी पुर्ण झाली. आता आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचा मुहूर्त ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार राहणार की जाणार ? याचा फैसला बुधवारी म्हणजेच १० जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत बंड पुकारत महाविकास आघाडी सरकार उलथून टाकले होते. शिवसेनेतील शिंदे गटाने भाजप सोबत युती करत सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. तत्पुरी महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेला सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना दिले. त्यानुसार सुनावणी पुर्ण झाली. या प्रकरणाचा निकाल १० जानेवारीला दिला जाणार आहे. निकालापुर्वीच शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांची धाकधूक वाढली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निकाल जाहीर होणार आहे. त्या अनुषंगाने निकालातील शाब्दिक त्रुटी दुर करण्याचं काम वेगाने सुरू आहे. निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदेतज्ञांकडे पाठवला असल्याचे बोलले जात आहे. १० जानेवारी २०२४ ला जाहीर होणाऱ्या निकालातील ठळक मुद्दे विधानभवनात वाचले जाणार आहेत. त्यानंतर दोन्ही गटांना निकालाची प्रत दिली जाणार आहे. हा निकाल ४ वाजता दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष या निकालाचे वाचन करणार आहेत.
पक्षांतरबंदी कायद्यानुसार हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजुने लागला तर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. जर निकाल एकनाथ शिंदे याच्या बाजुने लागला तर त्यांच्या गटातील सर्व आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार दूर होणार आहे. तत्पुर्वी शिवसेना कोणाची याचा निर्णय येणे अजून बाकी आहे. आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर शिवसेना कोणाची याचाही फैसला निवडणूक आयोगाकडून लवकर केला जाणार आहे. त्यामुळे १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांचा निकाल काय येतो याकडे देशाचे लक्ष लागले आहे.