मोठी बातमी : महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विश्वास नांगरे पाटलांकडे एसीबीच्या अप्पर पोलिस महासंचालक पदाचा कारभार !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा  : राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने आज काढले.या बदल्यांमध्ये आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील ( IPS Vishwas Nangre Patil ) यांचा समावेश आहे. नांगरे पाटलांची बदली ACB च्या अप्पर पोलिस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे.

Big news, Transfers of senior IPS officers in maharashtra, IPS Vishwas Nangre Patil is in charge of Upper Director General of Police of ACB,

विश्वास नांगरे पाटील हे सध्या मुंबईत कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता त्यांची बदली ACB च्या अप्पर पोलिस महासंचालकपदी करण्यात आली आहे. या बदलीच्या माध्यमांतून नांगरे पाटलांना बढती आणि पदोन्नती दिली गेल्याचे बोलले जात आहे.

पुण्याचे डॅशिंग पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांचीसुध्दा सरकारने बदली केली आहे. गुप्ता यांनी पुण्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोर मोहिम उघडली होती. पुण्यातील संघटीत गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर मोक्का कारवाया करण्याचा धडाका त्यांनी लावला होता. त्यांना सरकारकडून बढती देण्यात आली आहे.अमिताभ गुप्ता यांच्याकडे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (IPS Ankush Shinde) यांचीदेखील बदली करण्यात आलीय. त्यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आलीय. तर त्यांच्या जागेवर विनयकुमार चौबे (IPS Vinay Kumar Choubey) यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलीय.याशिवाय अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह (IPS Aarti singh) यांची सुद्धा मुंबईत बदली करत त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

तर मिलिंद भारंबे (IPS Milind Bharambhe) यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलीय. मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते (IPS Sadanand Date) यांची बदली करण्यात आली आहे. राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.