Breaking News : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
नवी दिल्ली: बिहारचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार मिळणार असल्याची मोठी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात येणार आहे. बुधवारी कर्पुरी ठाकूर यांची १०० वी जयंती असून, या पूर्वसंध्येला त्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
जनता दल युनायटेडने (JDU) कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. ठाकूर यांना भारतरत्न मिळणार असल्याची माहिती राष्ट्रपती भवनातून निवेदन जारी करून देण्यात आली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती जारी केली आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मला खूप आनंद होत आहे की भारत सरकारने सामाजिक न्यायाचे महान नेते कर्पूरी ठाकूर जी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा निर्णय देशवासियांना अभिमान वाटेल. मागासलेल्या आणि वंचितांच्या उन्नतीसाठी कर्पूरीजींची अतूट बांधिलकी आणि दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर अमिट छाप सोडली आहे. हा भारतरत्न त्यांच्या अतुलनीय योगदानाची विनम्र ओळख तर आहेच, पण त्यामुळे समाजात एकोपा वाढीस लागेल.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्वागत केले आहे. यावेळी नितीशकुमार म्हणाले की, माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते स्वर्गीय कर्पुरी ठाकूर जी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. केंद्र सरकारचा हा चांगला निर्णय आहे. कै.कर्पूरी ठाकूरजी यांना त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान दलित, वंचित आणि उपेक्षित वर्गामध्ये सकारात्मक भावना निर्माण करेल. स्वर्गीय कर्पूरी ठाकूरजींना ‘भारतरत्न’ देण्याची आमची नेहमीच मागणी होती.अनेक वर्षांपासूनची मागणी आज पूर्ण झाली आहे.
कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले की, जननायक कर्पूरी ठाकूरजी यांना मरणोत्तर जाहीर झालेला भारतरत्न हा खरे तर ‘सामाजिक न्याय’ चळवळीचा विजय आहे, जो सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या पारंपरिक विरोधकांनाही आता PDA च्या 90% लोकांच्या एकजुटीपुढे नतमस्तक व्हावे लागत असल्याचे दिसून येते. पीडीएची एकजूट फळ देत आहे. असे यादव म्हणाले.