मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी मुंबई दौरा रद्द केला. मनोज जरांगे पाटील पुन्हा आंतरवलीत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त वाढवला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना राबवल्या गेल्या आहेत. अंतरवलीत परतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या अंदोलनाबाबत मोठी घोषणा केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांनी उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करा असं ते मराठा बांधवांना म्हणाले आहेत.हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेऊन आणि त्यानंतर दोन-तीन दिवसानंतर ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना लोकांना भेटता येत नाहीये. यासाठी ते आता स्वता:च लोकांच्या भेटी घेणार आहेत. यासाठी त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलंय. गावातील महिलांच्या हातून रस घेऊन त्यांनी आपले उपोषणाचे आंदोलन १७ व्या दिवशी मागे घेतले. 17 व्या दिवशी अंतरवाली सराटी येथे माता भगिनीच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सोडले. त्यानंतर गावात साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली.
आज सकाळपासून काय घडलं ?
भांबेरी गावात रात्रभर हजारो समर्थकांसहीत मुक्काम केल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शहाणी भूमिका घेऊन अंतरवलीला परत जात आहे, अशी घोषणा त्यांनी केली. या निर्णयानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून जालना, बीड आणि संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आला आहे. मागील वेळेस मराठा आंदोलनाच्या काळात बीड आणि जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर अधिकची सुरक्षा ठेवण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
अंतरवाली सराटीमध्येही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथक जालन्यामध्ये दाखल झालं असून अंतरवाली सराटीमध्ये अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जालना आणि बीड जिल्ह्याच्या सीमांवर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक गाडी तपासूनच सोडली जात आहे. कोणालाही परवानगी शिवाय या जिल्ह्यांमध्ये प्रवेश दिला जात नाहीये. मागील आंदोलनाच्या वेळेस जालन्यामध्ये आमदाराच्या घर पेटवून देण्यात आलं होतं. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावरही हल्ला करण्यात आला होता.
रविवारी दुपारी मनोज जरांगे-पाटील अचानक मुंबईला जायचंय म्हणत अंतरवाली सराटीमधून निघाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांचा एकच गोंधळ उडाला.अंतरवाली सराटीपासून काही किलोमीटरवरील भांबेरी गावातून मागे फिरले. मात्र या कालावधीत तातडीने मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क करुन जालना आणि बीड जिल्ह्यात संवेदनशील भागांमध्ये तैनात करण्यात आलं. पोलिसांनी बीड आणि जालन्याच्या सीमांवर चेकपोस्ट उभारले असून सीमा सील केल्या आहेत.
बीडमध्ये तब्बल 38 ठिकाणी नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात 37 (1)(3) महाराष्ट्र पोलीस कायदा लागू करण्यात आला आहे. बीडमध्ये आज म्हणजेच सोमवारी (26 फेब्रवारी रोजी) दुपारी 4 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीड प्रमाणेच जालना आणि छत्रपती संभाजी नगरमध्येही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना प्रशासनाच्या निर्देशानुसार इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे संदेश पाठवण्यात आले आहेत.
भांबेरी गावामधून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी तयारी करत असलेल्या मनोज जरांगे-पाटलांच्या शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे या 2 सहकाऱ्यांना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतलं. या घटनेचे पडसाद जिल्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे राज्य परिवहन महामंडळाची बस पेटवून दिली. या जाळपोळीनंतर पुढील सूचना मिळेपर्यंत एसटीची सेवा जालना जिल्ह्यामध्ये स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.