ब्रेकिंग न्यूज : पद्मश्री ना.धो. महानोर (Na. Dho. Mahanor) यांचे पुण्यात निधन, साहित्यविश्वावर कोसळला दु:खाचा डोंगर
पुणे : मराठी साहित्य विश्वात महत्वाचे स्थान असणारे निसर्गकवी, ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी आमदार नामदेव धोंडो महानोर (ना.धो. महानोर) (Na Dho Mahanor) यांचं आज पुण्यात निधन झालं. मृत्युसमयी ते 81 वर्षांचे होते. त्यांच्यावर किडनीच्या आजाराचे (Kidney disease) उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांनी आज सकाळी साडेआठ वाजता पुण्यातील रूबी हाॅस्पीटलमध्ये (Ruby Hospital Pune) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे साहित्यविश्वासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वर्तुळावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Padmashri Na.Dho.Mahanor passed away )
जेष्ठ साहित्यिक ना. धो. महानोर यांचं लिखाण निसर्गाशी नातं जोडणारं होतं. त्यांच्या कवितेतून निसर्ग बोलायचा इतकं सुंदर त्यांच्या गीतांचे बोल होते. ‘मी रात टाकली..मी कात टाकली’ ही त्यांच्या लोकप्रिय गीतांपैकीच एक रचना आहे. त्यांचा ‘रानातल्या कविता’ हा कवितासंग्रह खूप गाजला होता. स्वत: शेतकरी असल्याने निसर्ग, शेतीविषयी असलेलं प्रेम त्यांच्या कवितेतून झळकायचं. महानोरांच्या पार्थिवावर उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नामदेव धोंडो महानोर (Namdeo dhondo mahanor) हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर 1942 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडा गावात झाला.तर जळगावात त्यांचं शिक्षण झालं. महाविद्यालयीन शिक्षण सोडून ते शेतीत रमले. त्यांच्या रानातील कवितांनी सर्वांनाच निसर्गाच्या प्रेमात पाडलं. ‘दिवेलागणीची वेळ’,’पळसखेडची गाणी’,’जगाला प्रेम अर्पावे’,’गंगा वाहू दे निर्मळ’ ही त्यांची लोकप्रिय कवितासंग्रह आहेत. तर ‘एक होता विदूषक’,’जैत रे जैत’,’सर्जा’,’अजिंठा’ या काही सिनेमांमध्ये त्यांनी गीतरचना केली. महानोर १९७८ साली महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त झाले. तर १९९१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.