Buldhana Bus Accident : हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग..? बुलढाणा बस अपघातावर राजकीय वर्तुळात उमटू लागल्या संतप्त प्रतिक्रिया, कोण काय म्हणाले वाचा सविस्तर
बुलढाणा, 1 जूलै 2023 : Buldhana Bus Accident : बुलढाणा बस अपघाताच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच सोशल मिडीयावर या घटनेबाबत सर्व नागरिक हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत. बस अपघाताच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सह आदी नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. बुलढाणा बस अपघातावर राजकीय नेत्यांनी नेमकं काय म्हटलयं पाहूयात.
बेदरकारीने गाड्या चालवतात त्यांना चाप बसवायलाच हवा – राज ठाकरे
बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय भीषण आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.
महामार्गांवर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे ड्रायव्हर्स आणि ट्र्क ड्रायव्हर तर कमालीच्या बेदरकारीने गाड्या चालवतात. ह्यांच्यावर चाप बसवायलाच हवा. अशा अपघातांच्या घटना परत कधीच होणार नाहीत ह्यासाठी आता प्रयत्न व्हायलाच हवेत, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न गंभीर, सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात – शरद पवार
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना.
या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात – अजित पवार
नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलढाणा – सिंदखेडराजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्यानं बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसनं पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षानं ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनानं तज्ञांच्या सल्ल्यानं यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेतील जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत. अशी प्रार्थना करतो.
समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या वतीनं सातत्यानं करण्यात आली आहे. शासनानं आतातरी या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे.
बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत – उदध्व ठाकरे
बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 26 जणांचा दुर्दैवी अंत झाला.हे वृत्त मन हेलावणारे आहे .गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत . आतापर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले .सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत.अपघातात जीव गमावलेल्या अभागी जिवांना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे, असे माजी मुख्यमंत्री उदध्व ठाकरे म्हणाले.
हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग..? – जितेंद्र आव्हाड
हा समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून पासून आतापर्यंत अनेक अपघात झालेत. गेली वर्षभरात त्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला.
समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा आणूनही अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे सामोरं आलेले आहे. यापुढे असे अपघात होऊ नये यासाठी सरकारने वेळीच उपाय-योजना करून योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत – बाळासाहेब थोरात
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे समृद्धी महामार्गावर अपघातानंतर पेट घेतलेल्या खासगी बसमधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि दु:खद आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली! जखमी प्रवाशी लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत ही ईश्वराकडे प्रार्थना . समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेसकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
अपघातामागील कारणांची सखोल चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज – प्रकाश आंबेडकर
समृद्धी महामार्गावर एका बसचा अपघात होऊन त्यात लागलेल्या आगीत २६ जण मृत्युमुखी पडल्याची वेदनादायक बातमी पहिली. या अपघातामागील कारणांची सखोल चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशी भावना वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
नेमकी घटना काय ?
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पिपळखूटा शिवारात आज पहाटे 2 वाजेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला.या अपघातात बस जळून खाक झाली. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेत २६ जीवंत माणसं जळून खाक झाली. या दुर्दैवी भीषण घटनेमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. (Buldhana Bus Fir)
यवतमाळ येथील विदर्भ ट्रॅव्हल्सची बस क्र.MH29 BE1819 ही यवतमाळ येथून पुण्याकडे जात होती. समृद्धी महामार्गाच्या चॅनेल क्र.३३२ जवळ रात्री १.३० ते २ वाजण्याच्या दरम्यान बस चालकाचे नियंत्रण सुटून ही बस दुभाजकाला धडकून उलटली. यानंतर लगेच बसने पेट घेतला. यावेळी पाच प्रवाशी व ट्रॅव्हल्सचे तीन कर्मचारी असे आठजण तात्काळ बसमधून बाहेर पडले. अन्य २६ प्रवाशी रात्रीच्या गाढ झोपेत असल्याने व बसने मोठा पेट घेतल्याने २६ प्रवाशांचा जळून घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या भीषण अपघाताची बातमी कळल्यानंतर पोलीस, अग्नीशमन दल आदी यंत्रणा मदतीसाठी धावल्या. परंतू बसमध्ये आगीने रौद्र रूप धारण केल्याने सर्व हतबल झाले. ते बसमधील प्रवाशांना वाचवू शकले नाहीत. आगीत होरपळलेल्या प्रवाशांचा आकांत ह्रदयाला पिळवटून टाकणारा होता. आरोग्य विभाग व पोलीसांनी सर्व मृतदेह बुलढाणा येथे जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या शवागारात हलवले आहेत.
या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या आठ जणांवर देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. मृतांची नावे मिळवण्याचे व ओळख पटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. मृतांच्या नातेवाईकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात मोबाईल क्र.7020435954 आणि 07262242683 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अपघातातील जखमी व्यक्तींची नावे
(चालक)-शे.दानीश शे.ईस्माईल या.दाव्हा जि.यवतमाळ, (क्लिनर) संदीप मारोती राठोड (३१) रा तिवसा, योगेश रामराव गवई रा.औरंगाबाद., साईनाथ चरमसिंग पवार (१९) रा माहूर, शशिकांत रामकृष्ण गजभिये या.पांढरकवडा, पंकज रमेशचंद्र रा.कांगडा (हिमाचल प्रदेश) या अपघातातील बसचा चालक व क्लिनर या दोघांना सिंदखेडराजा पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
बुलढाणा बस अपघातातील नागपुरच्या पाच मृतांची ओळख पटली
बुलढाणा बस अपघातातील मृतांमध्ये नागपुरच्या पाच मृतांची ओळख पटली आहे. यामध्ये आयुष गाडगे, कौस्तूभ काळे, इशांत गुप्ता, गुडीया शेख, योगेश गवई यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बुकिंग कार्यालयातून पोलीस प्रवाशांची माहिती घेत आहे. इतर मृतांची ओळख पटवण्याचे कामे सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्याला रवाना
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना प्रकट करुन या दुर्देवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्याला रवाना झाले आहेत.
या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी घटना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल.जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली.
मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाखांची मदत – पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने अतिशय दु:ख झाले. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझे विचार आणि प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे, बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाखांची मदत दिली जाणार आहे तर ५० हजारांची मदत दिली जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील रस्ता अपघात हृदयद्रावक – अमित शहा
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील रस्ता अपघात हृदयद्रावक आहे. या दु:खाच्या घडीमध्ये या भीषण अपघातात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. प्रशासनाकडून जखमींवर त्वरित उपचार केले जात आहेत. त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो,अशी भावना गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे.
घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु:खद – नितिन गडकरी
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु:खद आहे. अपघातातील मृतांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य मिळावे अशी प्रार्थना करतो. ईश्वर दिवंगतांना शांती प्रदान करो. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
मृतदेहांची डीएनए चाचणी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाचे काम अतिशय चांगले करण्यात आले आहे. त्याठिकाणी स्मार्ट सिस्टीम लावण्याचे काम करण्यात येणार आहे. उपाययोजना करत आहोत. याठिकाणी अपघात होणार नाहीत यासाठी प्रयत्न करत आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, बसला आग लागल्यामुळे 25 जणांचे मृतदेह जळाले आहे. त्यामुळं त्यांची ओळख पटने अडचणीचे जात आहे. त्यामुळे मृतदेहांची डीएनए चाचणी करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासोबत फडणवीस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी आता घटनास्थळी जाणार आहोत. तिथे जाऊन आम्ही घटनेची सविस्तर माहिती घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. हा अपघात होण्याची नेमकी कारणं काय आहेत, याबाबतची माहिती घेत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.