जामखेड टाईम्स वृत्तसेवा : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी 31 मे रोजी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे, यामुळे पडळकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ( case has been registered against BJP MLA Gopichand Padalkar at Karjat police station for making controversial statement)
कर्जत तालुक्यातील धनगर समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज (बुधवारी) कर्जत पोलिस स्टेशनला लेखी तक्रार अर्ज देऊन पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पडळकर यांच्या विरोधात कर्जत तालुक्यातील गणेेशवाडी येथील रविंद्र सखाराम पांडुळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले म्हणून भादवि कलम 505 (2) अन्वये गुन्हा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पडळकर यांनी कर्जत तालुक्यातील बेनवडी फाटा व चापडगाव येथे काल 31 मे रोजी (मंगळवारी) पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार यांच्यासह चौंडी येथे आलेल्या अनेक मंत्री व इतर सन्माननीय व्यक्तींबद्दल अपशब्द वापरले, त्यामुळे त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तक्रारी अर्जामध्ये पुढे म्हटले आहे की, गोपीचंद पडळकर यांनी कर्जत तालुक्यातील बेनवड फाटा व चापडगाव या ठिकाणी बोलताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी या जन्मगावी येऊन शरद पवार व आमदार रोहित पवार व इतरांना या ठिकाणी जयंती साजरी करण्याचा काय अधिकार आहे ? आजोबा व नातू यांच्या छाताडावर आमची पोरं नाचतील. तसेच पवार यांनी जयंती मध्ये राजकारण केले आहे, हे करताना त्यांनी आमच्या पन्नास-साठ वर्षांपासून अनेक पिढ्यांच नुकसान केले आहे. या वयात आजोबा आता नातवाला पुढे करत असून, ते आमच्या आणखी पाच पिढ्या नष्ट करतील, अशा पद्धतीने अनुद्गार काढले होते.
तक्रार अर्जावर रविंद्र सखाराम पांडुळे, अंगद रुपनर, महेश काळे, विजय पावणे, तानाजी पिसे, सागर मदने, चंद्रकांत खरात, व लहू रुपनर यांची नावे व सह्या आहेत.
दोन समाजात द्वेष निर्माण होईल असे प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी भाजपाचे आ गोपीचंद पडळकर यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी गणेशवाडी (ता.कर्जत) येथील रवींद्र सखाराम पांडुळे यांनी आ पडळकर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भाजपाचे आ गोपीचंद पडळकर यांनी हजर असलेल्या नागरिकांच्या समक्ष भाषणातून तसेच टीव्ही मीडियावर बोलत असताना सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीती निर्माण होईल तसेच समाज-समाजामध्ये द्वेष निर्माण होईल या हेतूने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कर्जत-जामखेडचे आ रोहित पवार तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीसाठी उपस्थित असलेल्या इतर नेते मंडळींवर प्रक्षोभक भाषण आणि विधाने करीत दोन समाज व समूहात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद रवींद्र पांडुळे यांनी दाखल केली आहे.