Chhagan Bhujbal : छगन भुजबळ दिल्लीला जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग, राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतयं ? जाणून घ्या
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीत (mahayuti) नाराजीनाट्य चांगलेच रंगले आहे. विशेषता: राष्ट्रवादीत (ncp) छगन भुजबळ विरूध्द अजित पवार (chhagan bhujbal vs ajit pawar) हा संघर्ष चांगलाच तापला आहे.राष्ट्रवादीत नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी समर्थकांच्या गाठीभेटी घेत पुढील राजकीय निर्णय घेण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादीत भूकंप होणार अशी चर्चा रंगली आहे.जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भुजबळ हे दिल्लीला जाणार असल्याची चर्चा आहे.(chhagan bhujbal meet cm devendra fadnvis)
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली.या भेटीनंतर भुजबळ हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. भुजबळ हे आज दिल्लीला रवाना होणार असून ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. या भेटीनंतर भुजबळ हे काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले की, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत राजकीय सामाजिक विषयांवर चर्चा झाली. माझ्यासोबत माजी खासदार समीर भुजबळ हे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीतल्या चर्चेत सहभागी होते. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत विविध मुद्यांवर चर्चा झाली. इतर घटकांसोबत ओबीसींमुळे महायुतीला चांगले यश मिळाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ओबीसी संघटनांच्या बैठका सुरू असून त्यांच्या नाराजीची कल्पना असल्याचे फडणवीसांनी म्हटले असल्याचे भुजबळांनी सांगितले.
ओबीसींनी महायुतीला भरभरुन आशिर्वाद दिला. त्यामुळे ओबीसींचे नुकसान होऊ नये अशी अपेक्षा असल्याचा मुद्दा आपण मांडला. त्यावर, सरकारही ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन फडणवीसांनी दिले असल्याचे भुजबळांनी सांगितले. ओबीसींच्या मु्द्दावर 8-10 दिवसात पुन्हा भेटू आणि मार्ग काढू असेही आश्वासन फडणवीसांनी दिले असल्याचे भुजबळांनी सांगितले. ओबीसींवर अन्याय होणार नाही, मी साधक-बाधक विचार करतोय असा निरोप ओबीसी संघटनांना द्यावा असेही फडणवीसांनी म्हटले असल्याचे भुजबळांनी म्हटले.
छगन भुजबळ यांच्या मेळाव्यात काही पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. तर, दुसरीकडे भुजबळांनी काही मुलाखतीत बोलताना मंत्रिमंडळात स्थान नसल्याने देवेंद्र फडणवीस यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले होते, असे सांगितले. एकीकडे फडणवीसांबाबत मवाळ धोरण तर दुसरीकडे अजित पवारांविरोधात कठोर धोरण भुजबळांनी घेतले होते. भुजबळांच्या या धोरणाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना ? असा सवाल आता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. भुजबळ काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.