शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली नाराजी, नेमके कारण काय? सविस्तर जाणून घ्या !
मुंबई : पक्षांतर बंदी कायद्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आज एकत्रित निकाल दिला. शिवसेना आमदार अपात्रता बाबीचा निकाल काय निकाल येणार याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले होते. नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सर्व 16 आमदार पात्र ठरवले. त्याचबरोबर बहुमताच्या आधारे शिंदे गटाकडे शिवसेना पक्ष सोपवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा देणारा निकाल नार्वेकर यांनी दिला खरा पण दिलासादायक निकाल मिळूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुद्द्यावर आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे, हा निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंसोबतच्या 16 आमदारांना तसंच ठाकरेंसोबतच्या आमदारांनाही पात्र ठरवलं, याचसोबत राहुल नार्वेकरांनी भरत गोगवले यांचा व्हीपही अधिकृत ठरवला आहे.विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
‘सत्याचा विजय, लोकशाहीचा विजय झाला आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं हे सिद्ध झालं. लोकशाहीमध्ये कुणालाही आपला पक्ष, आपली संघटना स्वत:च्या खासगी मालकीची समजून निर्णय घेता येणार नाही. घराणेशाहीला मोठी चपराक या निर्णयाने मिळाली. लोकशाहीमध्ये कलेक्टिव डिसिजन असतो, पक्ष म्हणजे खासगी मालमत्ता समजून पक्षात सगळ्यांना वेठीस धरता येत नाही’, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
‘पक्ष आणि व्हीप दोन्ही अधिकृत ठरवलं असताना भरत गोगवले यांनी सुनिल प्रभू आणि 13 जणांना अपात्र ठरवणारी जी याचिका आहे, त्याचा निर्णय दिला नाही, ती याचिका फेटाळली. हा आमच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले व्हीप अधिकृत, पक्ष अधिकृत आहे. संपूर्ण निकाल तपासून कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ’, असं सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी केलं.
निकाल त्यांच्या बाजूने लागतो तेव्हा संस्था चांगली, निकाल विरोधात लागतो तेव्हा संस्था वाईट असते. निवडणूक आयोगाला चुना आयोग म्हणाले. आजही चोरांचे सरदार म्हणाले. सुप्रीम कोर्टालाही सल्ले द्यायचं काम त्यांनी केलं आहे. कायदा आणि घटनेपेक्षा स्वत:ला मोठं समजतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या. स्वत:ची प्रॉपर्टी समजून पक्ष चालवता येणार नाही’, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
‘तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना त्यांचा धनुष्यबाण गहाण ठेवला, तो आम्ही सोडवला. बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले त्यामुळे तुम्हाला हे भोगावं लागलं. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे’, अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
‘बाळासाहेबांची संपत्ती, पैसे आम्हाला कधीही नको. ज्यांना संपत्ती पैसे पाहिजेत त्यांनी त्यांची वृत्ती दाखवली. बाळासाहेबांचे विचार हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे. 50 कोटी रुपये त्यांनी निर्लज्जपणे मागितले, आम्ही लगेच देऊन टाकले’, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
‘ठाकरेंसोबतचे आमदार डिसक्वालिफाय होणार. पुढची कार्यवाही केली तर त्यांना त्यांची पदं गमवावी लागतील, कारण अध्यक्षांनी भरत गोगवलेंना अधिकृत व्हीप निश्चित केलं आहे’, असा सूचक इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.