जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागली आहे.हे उत्सुकता आता लवकरच संपणार आहे.नव्या मंत्रिमंडळामध्ये 38 मंत्री असतील अशी माहिती आता समोर येत आहे. या मंत्रिमंडळाचा दोन टप्प्यांमध्ये विस्तार होऊ शकतो असेही बोलले जात आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर आले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. मंत्रिमंडळात आपला समावेश व्हावा यासाठी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचे मोर्चेबांधणी सुरू आहे.
11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, त्यामुळे 11 जुलै रोजी काय निकाल येणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी भाजप आणि शिंदे गटामध्ये मंत्रिमंडळाचे सूत्र ठरल्याचे बोलले जात आहे.त्यानुसार 38 जण मंत्रिमंडळामध्ये असतील अशी माहिती आता समोर येत आहे. मंत्रिमंडळात भाजपचे 25 तर शिंदे गटाचे 13 मंत्री असणार आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Rohit Pawar | रोहित पवारांचा गंभीर आरोप, सत्ता बदलामुळे काही लोकं अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतायेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशिवाय नव्या मंत्रिमंडळामध्ये बहुतांशी नवे चेहरे असू शकतात. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात कोणाला लॉटरी लागणार याचा सस्पेन्स मात्र कायम आहे.
एकनाथ शिंदे गटाकडे नगर विकास, एमएसआरडीसी ही खाती असू शकतात तर भाजपकडे गृह, अर्थ, महसूल ही महत्त्वाची खाती जाणार अशी माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते असणार आहे. भाजप नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देणार आहे.
रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल : जर कोणी आडवं आलं तर याद राखा
नव्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटाला प्रत्येकी तीन आमदारामागे एक मंत्री तर भाजपला चार आमदारामागे एक मंत्री असा सत्तेचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आहे. येत्या 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो त्यानंतरच नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा पदभार आज स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे पत्नी लता शिंदे खासदार श्रीकांत शिंदे तसेच कुटुंबातील इतर सदस्य, मंत्रालयातील अधिकारी आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे गटात
राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला आता पाठिंबा वाढत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील 66 शिवसैनिक नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. नगरसेवकांच्या या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.