Chandrasekhar. H. Vijayashankar : चोंडी हे अहिल्यादेवींचे नुसते जन्मगाव नसून ती तपोभूमी, त्यागभूमी व आदर्शभूमी आहे – राज्यपाल चंद्रशेखर. एच. विजयशंकर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : चोंडी हे अहिल्यादेवींचे नुसते जन्मगाव नसून ती तपोभूमी, त्यागभूमी व आदर्शभूमी आहे. राजमाता अहिल्यादेवींचा संघर्ष, चिंतन, मंथन, कार्यपध्दती आणि कार्यशैली, राज्यकारभार तसेच त्यांचा आदर्श भारत देश कधीच विसरू शकत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजाच्या हितार्थ मोठे काम केले आहे. त्यांचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. श्री क्षेत्र चोंडीच्या पवित्र भूमीत मला येण्याचे भाग्य मिळाले हे माझ्या अनेक जन्माचे पुण्य आहे, असे प्रतिपादन मेघालय राज्याचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांनी केले.
मेघालय राज्याचे महामहीम राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांनी बुधवारी (दि. १८) राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगाव असलेल्या जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चोंडी गावास भेट दिली. यावेळी त्यांनी चोंडी विकास प्रकल्पाची पाहणी केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर, शिल्पसृष्टी, अहिल्यादेवींच्या वाड्यास (गढी), किर्तीस्तंभास भेट दिली. अहिल्यादेवींचा इतिहास जाणून घेताना ते प्रचंड भारावून गेले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरचे वंशज आमदार प्रा.राम शिंदे यांनी त्यांना संपुर्ण परिसर दाखवत अहिल्यादेवींच्या गौरवशाली इतिहासाची माहिती दिली. यावेळी त्यांनी अहिल्यादेवींच्या स्मारकास भेट देत अहिल्यादेवींना अभिवादन केले.
चोंडी विकास प्रकल्पाला भेट दिल्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर आमदार प्रा. राम शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत वाखारे, तहसीलदार गणेश माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, सह आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना राज्यपाल विजयशंकर म्हणाले की, चोंडीच्या विकासकामांसाठी मदत लागल्यास मी मदत करायला तयार असल्याचे सांगितले. ३१ मे २०२५ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणण्यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी शिष्टमंडळासह दिल्लीला यावे आपण सर्वजण पंतप्रधानांची भेट घेऊ आणि त्यांना जयंती सोहळ्यास येण्याचा आग्रह धरू अशी ग्वाही दिली.
पुढे बोलतांना विजयशंकर म्हणाले की, धनगर समाज कायम प्रामाणिक राहिलेला आहे. देशात हा समाज वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो, परंतू या समाजाची काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत संस्कृती एकच आहे. अहिल्यादेवींचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांचाच आदर्श समोर ठेवून सर्वांनी काम करावे असे अवाहन त्यांनी केले.
मेघालयच्या राज्यपालपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, राजभवन हे आमदार खासदार मंत्र्यांसाठी न ठेवता ते सर्वसामान्य जनतेसाठी खुले ठेवावे. राजभवनात बसून कारभार न करता थेट जनतेत जावे, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, त्यावर मार्ग काढावा, त्यानुसार मी कामाला सुरूवात केली. मेघालयचे राजभवन सर्वांकरिता खुले आहे. महिन्यातील २० दिवस मी मेघालयातील जनतेसाठी देतो तर १० दिवस देशातील इतर भागासाठी देतो, या १० दिवसांत मी देशातील वेगवेगळ्या भागांना इतिहास संस्कृती व इतर समस्या जाणून घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे कुटुंबांने केले राज्यपालांचे स्वागत
कार्यक्रम संपल्यानंतर राज्यपाल विजयशंकर यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी जामखेड पंचायत समितीच्या सभापती आशाताई राम शिंदे यांनी त्यांचे औक्षण केले.यावेळी शिंदे कुटुंबियांच्या वतीने आमदार प्रा.राम शिंदे, आई भामाबाई शिंदे, पत्नी आशाताई शिंदे यांनी राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांचा यथोचित सन्मान करत स्वागत केले.यावेळी चोंडी गावातील स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण घुले, कर्जतचे सभापती काकासाहेब तापकीर, भगवान मुरूमकर, शरद कार्ले, रवि सुरवसे, प्रशांत शिंदे, ज्ञानेश्वर झेंडे, पांडुरंग उबाळे, गौतम उत्तेकर, शांतीलाल कोपनर, सोमनाथ पाचरणे, गणेश क्षीरसागर, अनिल गदादे, गणेश पालवे, महारूद्र महारनवर, अशोक महारनवर, उध्दव हुलगुंडे, गडदेमामा यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.