नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याला मोठा दणका, कोरोनाने नोंदवली सर्वाधिक रूग्णसंख्या,ओमिक्रॉन काहीसा थंडावला
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्याची वाटचाल पुन्हा एकदा मोठ्या संकटाकडे सुरू झाली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कोरोनाने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका दिल्याने राज्यातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोरोनाने राज्याला सर्वात मोठा दणका दिल्यानंतर नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी सुध्दा कोरोनाचा उद्रेक समोर आला आहे. राज्यात 1 जानेवारी 2022 रोजी 9 हजार 170 नवे रूग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यात ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी राज्यात ओमिक्रॉनचे 6 रूग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने केलेल्या रिपोर्टमध्ये हे रूग्ण आढळून आले आहेत. नव्या रूग्णांमध्ये पुणे ग्रामीण 3, पिंपरी-चिंचवड 2 तर पुणे मनपा 1 या रूग्णांचा समावेश आहे.
राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने सरकारचे टेन्शन वाढले आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात एकुण 1 हजार 445 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 7 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आज अखेर 2 लाख 26 हजार व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत तर 1064 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 32 हजार 225 इतकी झाली आहे.
राज्यात शनिवारी ओमिक्रॉनचे 6 नवे रूग्ण आढळून आले. राज्यात आज अखेर 460 ओमिक्रॉन रूग्ण आढळून आले आहेत. यातील 180 रूग्णांचे RTPCR अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.
राज्यात सर्वाधिक सक्रीय कोरोनाबाधित मुंबई जिल्ह्यात आहेत. मुंबईतील रूग्णांची संख्या 22 हजार 334 इतकी झाली आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 346 इतकी झाली आहे.
राज्य सरकारमधील अनेक मंत्री तसेच आमदारांना कोरोनेचा तडाखा बसला आहे. अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यातील 10 मंत्री आणि 20 आमदार तसेच इतर राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.
थर्टी फर्स्ट आणि नव वर्षाच्या स्वागतानंतर येत्या दोन तीन दिवसानंतर राज्यात काय स्थिती निर्माण होते यावर सरकारचे लक्ष आहे. या काळात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे परिणाम समोर येऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात शनिवार अखेर 346 सक्रीय कोरोनाबाधित रूग्ण आहेत. आज जिल्ह्यात 34 नवे रूग्ण वाढले. तर 57 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक कठोरपणे राबवण्यास सुरूवात झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवावेत असे अवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.