जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातआव्हाड यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात कोर्टाने आव्हाड यांचा जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंगाच्या गुन्ह्यातून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर ठाणे सत्र न्यायालयाने त्यांना हा जामीन मंजूर केला आहे.मात्र जामीनासोबतच आव्हाड यांना चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करण्याची अट घालण्यात आली आहे.
चित्रपटगृहात जाऊन शो बंद केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले जितेंद्र आव्हाड जामीनावर बाहेर आले. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं उद्धघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (13 नोव्हेंबर) झालं. या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.
याच कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एका महिलेनं केला. भाजपच्या महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा रिदा अजगर रशीद यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आव्हाड यांनी हा खोटा गुन्हा असल्याचं म्हणतं व्यतित होऊन राजीनामा देण्याची दर्शविली.
दरम्यान, याच गुन्ह्यात आव्हाडांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. आज या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयात हा गुन्हा राजकीय हेतून प्रेरित असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. न्यायाधीश पी. गुप्ता यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. याही प्रकरणात ॲड विशाल भानुशाली यांनी आव्हाड यांची बाजू मांडली
दरम्यान, हा गुन्हा राजकीय हेतून असल्याचा दावा आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनीही केला होता. त्यांनी ट्विट करत म्हटलं, “ज्या महिलेनं ही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याकडे मोटिव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रिदा रशीद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, त्या जामीनावर आहेत.”
“राष्ट्रवादी काँग्रेस व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत. अंगावर धडकणाऱ्या व्यक्तीला बाजूला करणं गुन्हा असेल, तर बाजारात, ट्रेनमध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील”, अशा शब्दात रुता सामंत यांनी संताप व्यक्त केला.