संगमनेर तालुक्यात वादळी पावसाचा हाहाकार : चक्रीवादळामुळे मुंजेवाडीत घराची भिंत अंगावर कोसळून तिघांचा तर मालदाडला झाड कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याला आज चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला. या चक्रीवादळामुळे संगमनेर तालुक्यात घडलेल्या दोन घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत. (Cyclone kills four in Sangamner taluka)

संगमनेर तालुक्यात आज दुपारी चारच्या सुमारास वादळी पावसाने धुमाकूळ घातला.पठार भागातील मुंजेवाडी परिसरामध्ये भिंत अंगावर कोसळून तिघांचा मृत्यू तर दोघे जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.तर दुसरीकडे तालुक्यातील मालदाड या गावांमध्ये अंगावर झाड कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी दुपारी अचानक जोरदार वादळी वारे सुटले होते, त्यानंतर गारांचा पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्यामुळे आणि पावसामुळे दुधवडे हे कुटुंबीयांसोबत घरात बसले होते.यावेळी अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने दुधवडे यांच्या घरावरील पत्रे उडून लांबवर जाऊन पडले.

तर त्याच दरम्यान घराच्या भिंतीही कोसळल्या. घराच्या भिंती अंगावर पडल्याने विठ्ठल भिमाजी दुधवडे (वय 75), हौसाबाई भिमाजी दुधवडे (वय 67), साहील पिना दुधवडे (वय 10) हे जागीच ठार झाले. तर वनिता पिना दुधवडे ( वय 8), मंदाबाई विठ्ठल दुधवडे (वय 70) हे जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती समजताच महसूल मंडल अधिकारी इराप्पा काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ गांधले, पोलीस नाईक संतोष खैरे, गणेश लोंढे, प्रशांत आभाळे यांच्यासह मनसेचे किशोर डोके, शिवसेनेचे जनार्दन आहेर, पोलीस पाटील सीताराम आभाळे, सरपंच अरुण वाघ, संतोष देवकर, संपत आभाळे, अशोक वाघ यांच्यासह आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना सरकारी रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मृतांना खासगी रुगणवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले. या हृदयद्रावक घटनेने पठार भागातून हळहळ व्यक्त होत आहे.

संगमनेर तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे संगमनेर शहरातून जाणाऱ्या नाशिक मार्गावर अनेक मोठी झाडे कोसळली आहेत तर शासकीय विश्रामगृह परिसरातही झाडे उन्मळून पडली आहेत