चिंताजनक : ऐन दिवाळीत सक्रीय होणार सीतरंग चक्रीवादळ, महाराष्ट्राला Sitarang Cyclone चा किती धोका? जाणून घ्या
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Sitarang Cyclone । ऐकीकडे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांना परतीचा पाऊस झोडपून काढत आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वांनाच हवा हवा असणारा मान्सून आता कधी परतणार याचीच सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. कारण परतीच्या पावसाने सर्वच चित्र पालटून टाकले आहे.
परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मोठी नुकसान झाली आहे.ऐन दिवाळीत पाऊस परतणार असे वाटत असतानाच आता आणखी एका चक्रीवादळाचा धोका जारी करण्यात आला आहे. यामुळे पावसाचा मुक्काम वाढणार असेच संकेत मिळत आहेत. यामुळे आता चिंतेचे वातावरण पसरू लागले आहे.
येत्या काही दिवसांत पश्चिम बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ सक्रीय होणार आहे. सोमवारी दक्षिण अंदमान समुद्रात सौम्य चक्रीवादळ तयार झाले आहे, सध्या हे चक्रीवादळ उत्तर अंदमान समुद्रात आहे अशी माहिती, पश्चिम बंगालच्या कोलकाता हवामान केंद्राने जारी केली आहे.
पुढील 48 तासांत दक्षिण – पुर्व बंगाल आणि लगतच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. याचे रूपांतर 22 ऑक्टोबर रोजी चक्रीवादळात होईल. हे वादळ पश्चिम वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे.या वादळाला सीतरंग (Sitarang Cyclone) हे नाव देण्यात आले आहे.
ऐन दिवाळीत हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे अशी माहिती कोलकाता हवामान केंद्राने दिली आहे. या वादळाची दिशा नेमकी कशी असेल? याबाबत आज भाष्य करणे घाईचे होईल, परंतू लवकर खात्रीशीर माहिती जारी केली जाईल असे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
सध्या महाराष्ट्राला परतीच्या पावसानं झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला आहे. ऐन दिवाळी बंगालच्या उपसागरात धडकणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही कमी-अधिक प्रमाणात धोका आहे. ‘सीतरंग’ चक्रीवादळाचा परिणाम म्हणून २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी पूर्व महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या परिसरात पावसाची शक्यता आहे.