Cyrus Mystry accident । मर्सिडीज कारमध्ये सात एअरबॅग असतानाही का नाही वाचला सायरस मिस्त्री यांचा जीव?
मुंबई : Cyrus Mystry accident । टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mystry) यांच्या अपघाती मृत्यूनंतर मर्सिडीज कारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लक्झरी गाड्यांची (Luxury Cars in India) सुरक्षा, त्यांचा वेग आणि इतर बाबी आता केंद्रस्थानी आल्यात. त्यामुळे मर्सिडीजसारख्या लक्झरी गाड्या सुरक्षित आहेत का? दोन पेक्षा जास्त एअरबॅग (Airbag) असूनही सायरस मिस्त्री यांचा जीव का वाचू शकला नाही, असा प्रश्नही उपस्थित होतोय.
कार अपघातात एअरबॅग महत्त्वाची भूमिका बजावतात. एअरबॅगमुळे आतापर्यंत अनेक प्रवाशांचा जीव वाचल्याच्या घटना समोर आल्यात. अशात मर्सिडीजमध्ये सात एअरबॅग असूनही सायरस मिस्त्री यांचा जीव का वाचू शकला नाही, असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. पण एअरबॅगलाही मर्यादा आहेत. कार अपघातात एखादी व्यक्ती गाडीच्या बाहेर फेकली गेली, तर एअरबॅगचा उपयोग शून्य असतो. सायरस मिस्त्री कार अपघातात झालेली धडक इतकी भीषण होती, की ड्रायव्हरला ब्रेक लावण्याचाही वेळ मिळाला की नाही, यावरुन शंका घेतली जातेय.
कारमध्ये बसलेल्या प्रवाशांनी सीटबेल्ट लावलेला होता. पण कार अपघाताचा इम्पॅक्ट इतका जबर होता की प्रवाशांना इंटरनर इंज्युरी झाली असावी, अशी शंका घेतली जातेय. प्रथमदर्शनी पाहणीत, ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूला बसलेल्या प्रवाशाचं डोकं विंडस्क्रीनला लागल्याची शंका घेतली जातेय. पण यामध्ये कितपत तथ्य आहे, हे चौकशीनंतरच समोर येईल
अपघाताचं प्रमुख कारण काय?
सायरस मिस्त्री यांच्या अपघाताचं प्रमुख कारण काय, याचा तपास केला जातोय. पण सध्यातरी अतिवेगामुळे हा अपघात घडला असावा, अशी शंका घेतली जातेय. सायरस मिस्त्री यांची कार 125 ते 150 च्या स्पीडने जात असावी. याच वेळी गाडी रस्त्यावर स्कीड झाल्यामुळे किंवा कुणालातरी वाचवण्याच्या नादात अथवा चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
आता अपघाताच्या ठिकाणी काही मृतदेह गाडीच्या बाहेर आढळून आलेत. त्यामुळे हे लोक गाडीच्या बाहेर फेकले गेले, स्वतःहून जखमी अवस्थेत बाहेर पडले आणि मग गाडीबाहेर त्यांचा मृत्यू झाला का, या बाबी तपासानंतर स्पष्ट होतील. शिवाय ज्या सुरक्षा भिंतीला गाडीने धडक दिली, तिला फारसा मार बसला नाही. मात्र कारचं मोठं नुकसान झालं होतं. या गोष्टी नेमकं काय सूचित करतात, हेदेखील तपासानंतरच स्पष्ट होईल, असे वृत्त tv9 मराठीने दिले आहे.
एअरबॅगमध्ये श्वास कोंडला जातो का किंवा गुदमरायला होतं का, अशी शंका कुणालाही येऊ शकते. पण असं होत नाही. एअरबॅग एका फुग्यासारखं काम करते. एअरबॅगमध्ये इनहर्ट गॅस असतो. याने कोणतंही नुकसान होतं नाही. अपघातात प्रवाशांना डॅशबोर्ड किंवा बाजूला धडक बसण्यापासून रोखण्याचं काम एअरबॅग करते आणि प्रवाशाला पुन्हा सीटच्या दिशेने ढकलते, असं जाणकार सांगतात.