Dana Cyclone Maharashtra rain Alert : वादळी पाऊस, गारपीट, महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस महत्वाचे, बंगालच्या उपसागरातील ‘दाना चक्रीवादळ’ उडवणार दाणादाण, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी !
Dana Cyclone Maharashtra rain Alert : भारताच्या बहूतांश भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. देशाच्या काही भागात थंडी सुरू झालीय तर काही भागात ऑक्टोबर हिटच्या तडाखा सुरू आहे. दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील काही भागात परतीच्या पावसाचे धुमशान सुरू आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या वादळामुळे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचे असणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक भागांना ऑरेंज व येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. याचा देशातील अनेक राज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. २१ ऑक्टोबर रोजी मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण भारतातील अनेक भागांत अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आलाय.
अहमदनगर-अहिल्यानगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट
महाराष्ट्रातील काही भागांत आज २० रोजी गारपीट व वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. १९ आणि २० ऑक्टोबर रोजी वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ”ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आलाय तसेच अहमदनगर-अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी ”येलो अलर्ट” जारी करण्यात आलाय. या काळात वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
नदी,ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस महत्वाचे
महाराष्ट्रातील अनेक भागात परतीच्या पावसाचा तडाखा सुरू आहे, यामुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे. त्याच आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही भागांना गारपीटीचा इशारा देण्यात आलाय, महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस महत्वाचे असणार आहेत. या काळात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
आज मराठवाडा व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय, आज बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट असं दुहेरी संकट असणार आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
‘दाना चक्रीवादळ’ उडवणार दाणादाण
पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले आहे, या चक्रीवादळाला ‘दाना चक्रीवादळ’ असे नाव देण्यात आलेय, हे चक्रीवादळ २४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान समुद्र किनारी धडकणार आहे. या वादळाचा भारतासह बांग्लादेश व म्यानमार या तीन देशांना फटका बसणार आहे. दाना चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे २०,२१,२४ या दिवशी तामिळनाडूत, २० व २१ रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर, २४-२५ रोजी ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये, २०- २२ पुद्दुचेरी, २० ते २४ कर्नाटक व केरळ या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
मागच्या काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे दक्षिण भारतामधील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. दक्षिण भारतात चेन्नईपासून बंगळुरूपर्यंत आणि पाँडेचेरीपासून तिरुवनंतपुरमपर्यंत मुसळदार पाऊस पडत आहे. तसेच पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि ओदिशामध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मागच्या २४ तासांमध्ये उत्तर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसह दक्षिण भारतातील अनेक भागांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तसेच पूर्वोत्तर भारत आणि झारखंड व बिहारच्या काही भागातही पाऊस पडला आहे. आता पुढच्या २४ तासांमध्ये उत्तर तामिळनाडू, रायलसीमा, कर्नाटक आणि केरळमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच केरळ, किनारी आंध्र प्रदेश ओदिशा, पश्चिम बंगाल, झारखंडचा काही भाग, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे.