Darshana pawar : दर्शना पवारचा गायब झालेला मित्र Rahul Handore नेमका कुठे ? पोलिसांच्या हाती लागले महत्वाचे धागेदोरे, काॅल आणि एटीएम लोकेशन सापडलं
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Darshana Pawar death case latest update : कोपरगावच्या दर्शना पवार या 26 वर्षीय तरुणीचा राजगड किल्ला परिसरात खून झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. मयत दर्शना पवार हिने MPSC परिक्षेत राज्यात सहावा क्रमांक पटकावला होता. ती रेंज फाॅरेस्ट ऑफिसर बनली होती.पण नियतीने तीचे स्वप्न अधुरे ठेवले. अधिकारीपदी रूजू होण्याआधीच तिचा खून झाला. या घटनेने संपुर्ण राज्य हादरून गेलं आहे. या प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे.
दर्शना पवार हिचा पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी अर्धवट सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता.मयत दर्शनाच्या मृतदेहावर ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालात मयत दर्शनाच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या. मयत दर्शना सोबत राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेला तिचा मित्र राहूल हंडोरे हा घटनेच्या दिवसापासून गायब होता. राहूल हंडोरे नेमका कुठे आहे याबाबतची मोठी माहिती समोर आली आहे.
12 जून रोजी दर्शना पवार व राहूल हंडोरे हे दोघे राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते.12 जून रोजी सकाळी दहा वाजत राहूल हा एकटाच किल्ल्यावरून खाली येत असल्याचे या भागातील एका हाॅटेलच्या सीसीटिव्हीत दिसत आहे.तेव्हापासून तो गायब झाला आहे.त्याचे लोकेशन वेगाने शोधले जात आहेत. मात्र अजूनही तो मिळून आलेला नाही. मात्र आता राहूल हंडोरे नेमका कुठं आहे याबाबत पोलिसांच्या हाती मोठी माहिती लागली आहे.
वारजे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्ता बागवे यांनी एका दैनिकाला दिलेल्या वृत्तानुसार राहूल हंडोरे याचं कात्रज हे शेवट लोकेशन होतं, त्यानंतर पुण्यातून दोन दिवसानंतर तो गायब झाला.त्यानंतर त्याचं एटीएम लोकेशन नवी दिल्ली दाखवण्यात आलं, तेथून त्याने पैसे काढले. रविवारी रात्री उशिरा तो एका नातेवाईकाशी फोनवर बोलला. मित्राशी वाद झाल्यानं पुणे सोडलं, असं तो नातेवाईकाला फोनवरून सांगत होता, त्यानंतर त्याने फोन बंद केला. त्यानंतर त्याचं शेवटचं फोन लोकेशन कोलकाता दाखवलं गेलं आहे.
दर्शना पवार खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच पथके तयार केले आहे. या पथकांच्या माध्यमांतून पोलिस वेगाने तपास करत आहेत. 9 जून पासून दर्शनाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. यातून दर्शनाच्या मृत्यूशी संबंधित धागेदोरे शोधले जात आहेत.
मयत दर्शना पवार ही 9 जून रोजी सदाशिव पेठेतील एका खाजगी क्लासने आयोजित केलेल्या सत्कार समारंभासाठी कोपरगावहून पुण्यात आली होती.पुण्यात दोन दिवस राहिल्यानंतर ती आपल्या मैत्रिणीकडे कार्यक्रमासाठी गेली होती. तेथून ती सिंहगड ला जाणार म्हणून निघाली होती.
दरम्यान, मयत दर्शना पवार ही राजगड किल्ल्यावर कशी आली, तीच्या सोबत कोण कोण होतं, गडावर तिला कोण कोण भेटलं, तिचा मृतदेह गडाच्या पायथ्याशी कसा आला, तिचा खून नेमका कुठे आणि कोणत्या कारणाने झाला, तीचे मारेकरी कोण, याचा सखोल तपास वेल्हे पोलिस करत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.
हायलाईट्स
● 9 जून रोजी दर्शना पवार पुण्यात आली होती
● 12 जून रोजी दर्शना पवार तिच्या मित्रासमवेत राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेली.
● 12 जूनला सकाळी 10 वाजता दर्शनाचा मित्र राहूल हंडोरे राजगड किल्ल्यावरून खाली येत असल्याचे cctvत दिसला
● त्यानंतर दर्शनाचा मित्र राहूल हंडोरे गायब
●17 जून रोजी दर्शनाचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळून आला
● दर्शना पवारच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
● राहूल हंडोरे नेमका कुठे आहे ? पोलिसांच्या हाती लागलं शेवटचं लोकेशन