Ram shinde News : कर्जत जामखेडमध्ये डेटा प्रायव्हसीचा प्रश्न गंभीर, तरुणांनो, तुमचा डेटा तुमचा हक्क, त्याच्या सुरक्षेसाठी लढा द्या – आमदार प्रा राम शिंदे

९ ऑक्टोबर २०२४ । सत्तार शेख । जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत – जामखेड मतदारसंघातील लोकांच्या नकळत त्यांचे नंबर चोरले गेलेत. अनेक खाजगी एजन्सीकडून मतदारसंघातील नागरिकांना फोन केले जात आहेत. राजकीय हेतूने प्रेरित असलेले हे फोन काॅल्स नागरिकांना वारंवार केले जात आहेत, उलट सुलट प्रश्न विचारून नागरिकांची वैयक्तिक माहिती विचारली आहे. या सर्व प्रकाराने नागरिक हैराण झाले आहेत. कर्जत-जामखेडमध्ये डेटा प्रायव्हसीचा प्रश्न गंभीर बनलाय. मतदारसंघातील तरुणांनो, तुमचा डेटा तुमचा हक्क आहे, त्याच्या सुरक्षेसाठी लढा द्या, मी तुमच्या सोबत आहे, असे अवाहन आमदार प्रा राम शिंदे यांनी केले.

Data privacy issue serious in Karjat Jamkhed, youth, your data your right fight for its security - MLA Ram Shinde news, karjat jamkhed latest marathi news today,

डेटा प्रायव्हसी संदर्भात आमदार प्रा राम शिंदे यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जनसंवाद पदयात्रेत अनेकांनी खाजगी कंपन्यांकडून वारंवार येत असलेल्या फोन्स काॅल्समुळे होत असलेल्या त्रासाची कैफियत आमदार शिंदे यांच्याकडे मांडली.आमदार शिंदे यांनी डेटा प्रायव्हसीच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत, या प्रश्नांवर फेसबुकवर पोस्ट लिहीत आवाज उठवला आहे.

आमदार राम शिंदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले आहे पाहूयात

तोडकरवाडीत शाळेतील मुलींनी त्यांच्या साहित्य वाटपाबाबतची अडचण मांडली. या चर्चेदरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला – डेटा प्रायव्हसीचा गंभीर प्रश्न. लोकांच्या नकळत त्यांचे नंबर चोरले गेले. या सर्व नंबर वर आता प्राइवेट कंपन्या कॉल करत नाहीत एवढ्या प्रमाणावर फ़ोन चालू आहेत..  उलट सुलट प्रश्न विचारले जात आहे… नागरिकांना एवढा त्रास देणे खरच योग्य आहे का…?

गावकऱ्यांनी सांगितलं की काही एजन्सी नागरिकांना वारंवार फोन करून त्यांची वैयक्तिक माहिती विचारत आहेत. त्यांचा डेटा गोळा करून त्याचा अनधिकृत वापर होत आहे. हा गैरवापर लोकांच्या प्रायव्हसीवर गंभीर परिणाम करत आहे. पाच वर्षांतच आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित राहिलेली नाही. या धोकादायक ट्रेंडवर तरुणांनी जागरूक होणं गरजेचं आहे. आपल्या हक्कांची जाणीव असणं आणि आपल्या डेटा सुरक्षेसाठी पाऊल उचलणं काळाची गरज आहे.

तरुणांनो,प्रत्येक चकाकनारी गोष्ट सोन नसते…तुमचा डेटा तुमचा हक्क आहे! त्याच्या सुरक्षेसाठी लढा द्या, असे अवाहन आमदार शिंदे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केले आहे.

गावात व शहरात आजकाल डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. प्रत्येकजण स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करत आहे. त्यामुळे, आपली वैयक्तिक माहिती जसे फोन नंबर, ई-मेल, आणि बँक माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. परंतु, याच माहितीच्या चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. डेटा चोरी म्हणजे आपल्या माहितीचा गैरवापर करणे, ज्यामुळे आपल्याला मोठा धोका होऊ शकतो.

डेटा चोरीचे प्रकार

डेटा चोरीचे अनेक प्रकार आहेत. काही वेळा, हॅकर्स आपल्या संगणकावर किंवा मोबाईलवर प्रवेश करून आपल्या माहितीची चोरी करतात. दुसरीकडे, काही वेळा वेगवेगळ्या फसव्या योजनांचे फाॅर्म भरून घेतले जातात, त्यावर तपशिलवार माहिती भरून घेतली जाते, मग ही माहिती संकलित करून जमा झालेल्या डेटाचा गैरवापर केला जातो, काही लोक फसवे ई-मेल किंवा लिंक पाठवून आपल्याला भुलवतात.विविध योजनांच्या किंवा इतर गोष्टींच्या फसव्या लिंक पाठवल्या जातात,त्या लिंकवर क्लिक केल्यास, तुमची माहिती चोरली जाते.

प्रायव्हसी म्हणजे काय?

आपली माहिती सुरक्षित ठेवणे म्हणजे प्रायव्हसी. जर तुम्ही सोशल मीडियावर तुमची व्यक्तिगत माहिती शेअर करत असाल, तर तुम्ही ती सुरक्षा धोक्यात आणता. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती किंवा ओळखपत्राचे फोटो पोस्ट केल्यास, तुम्ही अनवधानाने डेटा चोरीसाठी मार्ग तयार करत आहात. योजनांच्या नावाखाली जे फाॅर्म भरून घेताना आधार कार्ड, रेशनकार्ड,  पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र,  बँक पासबुक झेरॉक्स दिले जाते, मग तुमचा डेटा चोरीस जाण्याचा धोका अधिक असतो.

उपाय आणि काळजी

आपल्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत:

  • कागदपत्रे देताना काळजी घ्या : अनेक खाजगी संस्था, व्यक्तींकडून विविध सर्व योजना, योजनांच्या नावाखाली घरोघरी माहिती संकलित केली जाते. फॉर्म घेतले जातात, त्यासोबत काही कागदपत्रांची मागणी केली जाते. अशी कागदपत्रे देणे टाळावे.तसे न केल्यास डेटाचा गैरवापर होतो. मग आर्थिक नुकसान व मनस्ताप सहन करण्याची वेळ येते.
  • मजबूत पासवर्ड वापरा: तुमच्या खात्यांमध्ये मजबूत आणि अद्वितीय पासवर्ड ठेवा. यामुळे हॅकर्ससाठी तुमच्या खात्यात प्रवेश मिळवणे कठीण होईल.
  • सामाजिक नेटवर्कवर सावध राहा: फेसबुक, ट्विटर किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही कोणती माहिती शेअर करत आहात, त्यावर विचार करा. अनावश्यक माहिती शेअर करणे टाळा. खाजगी संवेदनशील माहिती सोशल मिडीयावर शेअर करणे टाळा.
  • फसव्या ई-मेलपासून दूर रहा: तुम्हाला आलेले सर्व ई-मेल विश्वसनीय असतात असे समजू नका. अनोळखी व्यक्तींचे ई-मेल उघडताना सावध रहा आणि फसव्या लिंकवर क्लिक करू नका.
  • सुरक्षितता सॉफ्टवेअर वापरा: आपल्या संगणकावर किंवा मोबाईलवर सुरक्षात्मक सॉफ्टवेअर स्थापित करा. हे तुम्हाला हॅकिंग आणि वायरसपासून वाचवतील.
  • दुय्यम प्रमाणीकरण वापरा: तुमच्या खात्यांमध्ये दुय्यम प्रमाणीकरण सक्षम करा. यामुळे, तुमच्या खात्यात प्रवेश मिळवण्यासाठी दुसरा तपासणी टप्पा असेल, जो सुरक्षा वाढवतो.

स्थानिक समुदायाची भूमिका

गावातील लोकांना या मुद्द्यावर जागरूक करणे आवश्यक आहे. स्थानिक संघटना आणि तरूणांनी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यामुळे, लोकांना माहितीच्या सुरक्षिततेचे महत्त्व समजेल आपल्या माहितीची सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे, डेटा चोरीच्या या समस्येवर लक्ष ठेवणे आणि योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. आपल्या माहितीची काळजी घेतल्यास आपण सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे स्वता:  व इतरांना सुरक्षित करा आणि आपल्या सर्वांना माहितीला सुरक्षित ठेवा!

तुमचा डेटा तुमचा हक्क त्याच्या सुरक्षेसाठी लढा द्या

मोबाईल नंबर हा केवळ संपर्काचे साधन न ठेवता, तुमची जात, तुमची आर्थिक स्थिती, तुमचे राजकीय मत कुणाला, हे ओळखण्यासाठी नागरिकांना फोन केले जात आहेत. त्या माहितीचा वापर करून सर्वसामान्य जनतेचा मेंदू हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सतत फोन करून लोकांना नाहक त्रास देण्याचा, राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न होत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे, आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित राहणे हा आपला संवैधानिक अधिकार आहे, त्या अधिकारावरच गदा आणण्याचे उद्योग कर्जत-जामखेड मतदारसंघात सुरू आहे.तुमचा डेटा तुमचा हक्क आहे त्याच्या सुरक्षेसाठी तरुणांनी जागरूक नागरिकाची भूमिका घेऊन लढा द्यायला हवा.